मुंबई : पवई तलावाची सद्यस्थितीची दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य पाणथळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे.पवई तलावाचा ऱ्हास होण्यापासून संरक्षण करण्यासाठी पर्यावरण संवर्धनविषयक काम करणाऱ्या संस्थांनी ‘सेव्ह पवई लेक’ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत डीके फ्लॅग फाऊंडेशनचे सदस्य डॉ. राकेश बक्षी यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) तक्रार केली आहे.
दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी पवई तलावात सोडण्यात येते. तसेच तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलवर्णी फोफावली आहे. सांडपाणी आणि जलपर्णीमुळे तलावातील प्राणवायूची पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मगरी आणि अन्य जलचरांना धोका निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय यासंदर्भात कोणतीही कारवाई वेळेत केली जात नसल्याची बाब डॉ. राकेश बक्षी यांनी निदर्शनास आणून दिली.
ही बाब लक्षात घेऊन मुख्य खंडपीठाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य पाणथळ जमीन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. समितीने दोन आठवड्यांच्या आत बैठक घ्यावी, तलावाच्या जागेला भेट द्यावी, अर्जदाराच्या तक्रारींची चौकशी करावी, अर्जदार आणि संबंधित प्रतिनिधींना सहकार्य करावे, वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि योग्य उपाययोजना सुचवणारा अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. मुख्य खंडपीठाने १० जुलै रोजी आदेश दिला. यासंदर्भातील अहवाल एका महिन्यात पश्चिम विभागीय खंडपीठाकडे सादर करावा, असे निर्देश देऊन लवादाने पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी ठेवली.
‘सेव्ह पवई लेक’ विशेष मोहीम
काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालाव स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी ‘सेव्ह पवई लेक’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, जलपर्णीच्या वेढ्यातून पवई तलाव मुक्त करण्यासाठी सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता. याचबरोबर तलावातील जलपर्णीही काढण्यात येत होती. तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याबद्दल स्थानिक रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त केली होती. जोपर्यंत तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी केला आहे.