अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार धारण केला आहे. रविवारपासून चक्रीवादळाचं स्वरूप तीव्र होताना दिसत असून, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे.

केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी २० किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.

सध्या चक्रीवादळ मुंबईपासून १६० किमी अंतरावर आहे. तर दीवपासून ८४० किमी अंतरावर आहे. चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केल्यानं मुंबईत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग वाढणार असून, ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी १७० ते १८० इतका राहणार आहे.

अजित पवारांची मंत्रालयातून वादळावर नजर

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबई विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी लिंक बंद

चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून, मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून होणारी वाहतूक पुढील तीन तासांसाठी थांबवण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रतितास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून, जिल्ह्यांमधील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रतितास ७५ ते ८५ किमी वेगाने वारे वाहणार असून, वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये ३८९६, सिंधुदुर्ग १४४ आणि रायगडमध्ये ८,३६० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.