टाटा सन्सकडून एक निवदेन जाहीर करून सायरस मिस्त्री यांच्यावर समूहाचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला. सायरस मिस्त्री यांची गुरूवारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक मंडळ अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर टाटा सन्सकडून हे निवदेन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांनी आपला विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. तसेच सायरस मिस्त्री समुहातील मुख्य कंपन्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपही टाटा सन्सने केला आहे. समुहाचा एकमेव चेहरा बनता यावे, यासाठी मिस्त्री यांनी योजनापूर्वक रणनीती आखली होती. मिस्त्री यांच्या नेतृत्त्वकाळात टाटा समुहाची १०० वर्षे जुनी शिस्त मोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे समूह प्रवर्तक आणि समभागधारकांपासून दूर चालला होता, असे टाटा सन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
तत्पूर्वी आज सकाळीच सायरस मिस्त्री यांची आता समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक मंडळ अध्यक्षपदावरूनही उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी अंतरिम अध्यक्ष म्हणून इशात हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीसीएसकडून याबाबत मुंबई शेअर बाजाराला कळविण्यात आले आहे. या निर्णयामुळे सायरस मिस्त्री यांना आणखी एक मोठा झटका बसला होता.
दरम्यान, इशात तातडीने त्यांच्या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. नव्या अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत ते या पदाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या इशात टाटा समूहातील टाटा सन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. यापूर्वी इशात यांनी टाटा स्टीलचे कार्यकारी संचालक (वित्त) म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यापासून सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर मिस्त्री यांनी समूहाच्या संचालक मंडळ तसेच विश्वस्तांना लिहिलेल्या इ-मेलमध्ये समूहाच्या एकूणच कारभारावर टीका केली होती. मात्र, मिस्त्री यांनी संचालक मंडळ सदस्य व विश्वस्तांना लिहिलेल्या व प्रसिद्ध झालेल्या पत्राबाबतची घडामोड अयोग्य असल्याचे नमूद करत हा एक ‘पोरकट’पणा असल्याचे टाटा समूहाने म्हटले होते. मिस्त्री यांच्या पोकळ दावे आणि दुर्भावनायुक्त आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समूहाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपकाही समूहाने ठेवला होता.