मुंबई : मुंबईमधील ठिकठिकाणच्या कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, तसेच व्यावसायिकांना दुपारी घरच्या जेवणाचा डबा नित्यनियमाने पोहोचविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेला (उद्धव ठाकरे) पाठींबा दिला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) आतापर्यंत मुंबईच्या डबेवाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे वरील निर्णय घेतल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनने जाहीर केले.

शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मुंबईच्या डबेवाल्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रेल्वे स्थानकांबाहेर सायकल स्टॅण्ड, डबेवाला भवन आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर भविष्यात डबेवाल्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्नही उद्धव ठाकरे सोडवतील आणि त्यांना परवडणाऱ्या दरात मुंबईत घर देतील, तसेच डबेवाल्यांचे प्रलंबित प्रश्नही तेच मार्गी लावतील असा विश्वास आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. त्यामुळे मुंबई डबेवाला असोशिएशनने महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मुंबई डबेवाला असोशिएशनने वरील घोषणा केली.

हेही वाचा – Raj Thackeray : “ती बातमी आली अन्…”, राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंना निवडणुकीला उभं करण्यामागचं कारण

हेही वाचा – रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डबेवाल्यांचा स्वाभिमान जपण्याचे काम शिवसेनेने (उद्धव ठाकरे) नेहमी केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण आम्हाला मान्य आहे. डबेवाले कायमच शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे मुंबई डबेवाला असोसिशएनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले.