मुंबई : शालेय शिक्षण विभाग विद्यार्थी हिताच्या विविध उपक्रमांना गती देत आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘शासकीय विद्यानिकेतन’च्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विद्यानिकेतनाचा लौकिक कायम राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यानिकेतनाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त महामेळाव्यात बोलताना सांगितले.
तत्कालिन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून राज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, पुसेगाव (सातारा), अमरावती येथे आणि केळापूर (यवतमाळ) येथे शासकीय विद्यानिकेतन या निवासी शाळा स्थापन झाल्या. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेतलेल्या गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना तेथे दर्जेदार शिक्षण दिले जाते.
या विद्यानिकेतनाच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नियमित पुढाकार घेतला जातो. त्याचप्रमाणे शाळेच्या उन्नतीसाठी मेळाव्याच्या माध्यमातून विचारमंथन केले जाते. या माजी विद्यार्थ्यांचा संयुक्त महामेळावा १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील बंटारा भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भुसे यांनी माजी विद्यार्थ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
विद्यानिकेतन शाळांच्या गरजांवर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. भौतिक सुविधा व डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा आहार, कला-क्रीडा सुविधा आणि इतर विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांनाही गती दिली जाईल. विद्यानिकेतनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक सूचनांचे स्वागत करुन शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी येत्या १५ दिवसांत नियामक मंडळाची बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय विद्यानिकेतनांनी राखलेली परंपरा ही राज्याच्या शिक्षण क्षेत्राचा अभिमान आहे. या संस्थांनी देशाला अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर दिले आहेत. शासनाने माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करावा, अशी भूमिका घेतली असून विद्यानिकेतनने ही परंपरा पूर्वीपासूनच कायम राखली आहे. पाचही शाळांचा एकत्र स्नेहमेळावा आयोजित करणे ही उत्तम संकल्पना आहे. विद्यार्थीदशेच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा जोडणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
माजी विद्यार्थ्यांमार्फत शाळेसाठी विविध माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीबाबतही कौतुकोद्गार काढून १९७१ नंतर शाळेतून उत्तीर्ण झालेले सुमारे १५०० माजी विद्यार्थी शाळेच्या उन्नतीबाबत चर्चा करण्यासाठी महामेळाव्यास उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ‘सुपर १००’ निवासी शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस असून जिल्ह्यातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात प्रतिभा घडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.
