नरीमन पॉईंट परिसरातील समुद्रात घुसलेले जमिनीचे टोक लवकरच मुंबईकरांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे. मात्र आता लवकरच या टोकाचे सुशोभिकरण केले जाणार असून मुंबईकरांना मुंबईतील तिसरी दर्शक गॅलरी नरीमन पॉइंट येथे उपलब्ध होणार आहे.

मरीन ड्राईव्हचा अर्धगोलाकार भूभाग नरीमन पॉईंटला जेथे संपतो, तो भाग म्हणजे मुंबईची खास ओळख. एनसीपीएच्या समोर असलेल्या या भागापर्यंत अनेक जण सकाळ संध्याकाळी चालण्यासाठी, धावण्यासाठी येतात. याठिकाणी जमिनीचा अरुंद असा भाग समुद्रात शिरलेला आहे. हा खास वैशिष्टयपूर्ण असा भाग सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय असतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही या ठिकाणी झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरक्षेच्या कारणास्तव हा भाग पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवेश बंद होता. आता लवकरच तेथे सर्वसामान्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. हा भाग खुला करून त्याचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी दिली. या विभागातील आमदार व विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहूल नार्वेकर यांनी या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : शिंदे, राज यांच्याबरोबरच्या दिपोत्सवानंतर फडणवीसांचं BMC निवडणुकीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पुढच्या वर्षी दिवाळीचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ठिकाणी कोणतेही नवीन बांधकाम करण्यात येणार नसून आहे तोच भाग सुशोभित करण्यात येईल. पालिकेचा नियोजन विभाग या कामाची अंमलबजावणी करणार आहे. मात्र हा परिसर पुरातन वास्तू विभागांतर्गत येतो. तसेच सध्या या ठिकाणी कोणताही कठडा नाही, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होता. संपूर्ण ६० मीटर लांब अरुंद भूभाग सुरक्षित करण्यासह याठिकाणी रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा असे बदल करण्यात येतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या ठिकाणी लोखंडी प्रवेशद्वारे बसण्यासाठी जागा तयार करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.