मुंबई / Mumbai Dahi Handi 2025 Celebration : मुंबई-ठाण्यामध्ये उंच दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात गोविंदा पथके व्यग्र असतानाच उत्सवाला गालबोट लागले. मानखुर्द परिसरात बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एका गोविंदाचा पडून मृत्यू झाला. तर ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरून कोसळून ३० जण जखमी झाले.
मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात बाल गाेविंदांसाठी दुपारी ३ च्या सुमारास दहीहंडी बांधत असताना जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) याचा पहिल्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. पहिल्या मजल्यावरून पडल्यानंतर जगमोहनला त्याच्या नेतावाईकांनी तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना थरावरून पडल्याने ३० जण जखमी झाले आहेत. यातील १५ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर विविध रुग्णालयांमध्ये १५ गोविंदांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई शहरामध्ये १८ जण जखमी झाले असून, त्यापैकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत. ६ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आलेत. तसेच पूर्व उपनगरामध्ये सहा जण जखमी झाले आहेत त्यातील तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, तिघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. एकावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, पाच जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, थरावरून कोसळून जखमी झालेल्या गोविंदाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या रुग्णालयात गोविंदांवर उपचार
जखमी गोविंदांपैकी पाच जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. नायर व शीव रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आले. जोगेश्ववरीतील ट्रॉमा रुग्णालयामध्ये तीन आणि अन्य उपनगरीय रुग्णालयांमध्ये दोन जणांवर उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे जी.टी. रुग्णालय व सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आलेत. या दोन्ही व्यक्तींच्या डोक्याला मार लागला आहे.