मुंबई: दहीहंडी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर यंदा राज्यातील दीड लाख गोविंदाना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे व त्याच बरोबर खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे. त्यासाठी मागील दोन वर्षापासून ७५ हजार गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.यंदा यात वाढ करुन दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळावे अशी मागणी मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यावेळी गोविंदांचा विमा काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. याकरिता अंदाजे एक कोटी २५ लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे एका गोविंदाला दुर्दैवाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, अपघातग्रस्त असेल तर ५ लाख, अडीच लाख किंवा किरकोळ जखमी असेल तर एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.