scorecardresearch

‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळे एकनाथ शिंदे व्यथित

‘अवघ्या दीड वर्षाच्या नातवालाही नाही सोडलं’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”
उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळे एकनाथ शिंदे व्यथित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर केलेल्या टीकेमुळे येत्या काळात दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे बीकेसीमधील दसरा मेळाव्यात भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची माहिती चिठ्ठीच्या माध्यमातून दिली जात होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलगा आणि नातवावर टीका केल्याचं समजताच त्यांचा संताप अनावर झाल्याचं समजत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल अशी रणनीती आखण्यात आली होती. उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाची काही टिप्पणी एकनाथ शिंदे यांच्याकडे येत होती.

Dasara Melava 2022 : हिंदूत्वाबाबत तडजोड नाही ; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर शेलक्या शब्दात प्रहार केले. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला. उद्धव ठाकरेंनी मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांक्ष यांचा उल्लेख केल्याची चिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांचा संताप अनावर झाल्याचे त्याच्या विश्वसनीय समर्थकांनी सांगितलं.

“माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात? पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का? लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

तुमच्याकडून हिंदूविचारांना मूठमाती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील अनेक मुद्दे नियोजित होते. मात्र त्यांच्या मुलाच्या आणि विशेषतः नातवाच्या उल्लेखामुळे ते व्यथित झाल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शिवसेनेतील बंडानंतरही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करणं टाळलं होतं. असं असताना कुटुंबियांवर झालेल्या टीकेमुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख ‘ हम दो हमारे दो ‘ असा केल्याचं सांगण्यात येतं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या