मुंबई : कोकणातील निसर्ग सौंदर्य, तिथल्या रूढी-परंपरा आणि लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाची पहिलीवहिली झलक नुकतीच समोर आली होती. गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारक कथानकाची जोड असणाऱ्या या चित्रपटासंदर्भात प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या चित्रपटाची भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील ‘अवर स्टुपिड रिॲक्शन्स’ या प्रसिद्ध यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सनी ‘दशावतार’ चित्रपटाची पहिली झलक पाहून दृश्यसौंदर्य, भव्य व लक्षवेधी नेपथ्य, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संकल्पनेचे विशेष कौतुक केले आहे.
जगभरातील चित्रपटांचा आढावा घेऊन त्यामधील विविध बाजूंवर चर्चा करीत आपली मते व्यक्त करणारे अमेरिकेतील प्रसिद्ध समीक्षक तथा कंटेंट क्रिएटर कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी ‘दशावतार’ चित्रपटाचीही पहिली झलक पहिली असून त्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ‘दशावतार चित्रपटाचा टीझर एखाद्या हॉलिवूड दर्जाच्या पौराणिक चित्रपटासारखा भासत आहे. मराठी चित्रपट अशा पातळीवर बनत असल्याचे पाहून खूप आनंद झाला’, असे मत कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी व्यक्त केले. सध्या ‘दशावतार’ चित्रपटाची पहिली झलक पाहून विविध प्रतिक्रिया येत असून त्यासंबंधित व्हिडिओज सर्वत्र व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘दशावतार’बद्दलची उत्सुकता मर्यादित प्रेक्षकांपुरती न राहता, आता जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांच्या कार्यक्रमात चर्चिला जाणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी आणि किंबहुना पहिला भारतीय प्रादेशिक चित्रपट असावा.
घनदाट जंगलात पाण्यातून धावणारे, हातात दिवट्या घेऊन केलेला नाच, कातळशिल्प, खाणकाम, पौराणिक चित्रे आणि गूढ विचारात नेणारे पार्श्वसंगीत कानावर पडत समोर आलेली ‘दशावतार’ चित्रपटाची पहिलीवहिली झलक पाहून विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकूणच देवभूमी कोकणात साकारलेली नेमकी कोणती भव्य कथा? ‘दशावतार’ चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार, यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू आदी वैविध्यपूर्ण भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत करणारे दिग्गज अभिनेते ‘दिलीप प्रभावळकर वयाच्या ८० व्या वर्षी एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यानंतर दिलीप प्रभावळकर यांची भूमिका नेमकी काय असेल? कोकणातील लोककला असलेल्या दशावतारी नाटकांचा धागा हा कथेत कशा पद्धतीने जोडलेला असेल ? दशावतारी कलाकारांचे कोणते नवे भावविश्व मोठ्या पडद्यावर उलगडणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत.