माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर अब तक ११२ नावाचा एक चित्रपट येतो आहे. या चित्रपटात प्रदीप शर्मांच्या आयुष्यात घडून गेलेल्या प्रसंगांबाबत भाष्य असणार आहे. यानिमित्ताने प्रदीप शर्मांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रदीप शर्मांनी राज ठाकरेंच्या जिवाला कसा धोका होता ते सांगितलं. शिवाय अंडरवर्ल्डच्या एका भयंकर टेस्टविषयीही सांगितलं. गवळी गँगचा सादिक कालिया हा जेव्हा दाऊद गँगमध्ये आला तेव्हा त्याला ही टेस्ट द्यावी लागली होती.

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले प्रदीप शर्मा?

“आम्ही १० ते १२ नंबर ट्रॅक करत होतो. त्यात अचानक राज ठाकरेंचा उल्लेख झाला. राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता. राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते. त्यांच्या जिवाला धोका आहे हे आम्हाला समजलं. आम्ही सगळी माहिती तेव्हा सह पोलीस आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांना सांगितलं. त्यानंतर राज ठाकरेंना आयुक्त जाऊन भेटले आणि सांगितलं की तुमच्या जिवाला धोका आहे तुम्ही कोकण दौरा करु नका. त्यावेळी त्यांनी तो दौरा रद्द केला होता. ” अशी माहिती प्रदीप शर्मांनी दिली.

अंडरवर्ल्डमधली भयंकर टेस्ट

“सादिक कालियाचा १२ डिसेंबर १९९७ ला एन्काऊंटर केला होता. सादिक कालिया दाऊद गँगचा प्रमुख शूटर होता. २२ हत्यांमध्ये तो स्वतः होता. तो वाँटेड होता. तो गँगमध्ये कसा होता आम्ही माहिती काढली. आधी सादिक कालिया अरुण गवळीच्या गँगमध्ये होता. त्यात हत्येच्या सुपारीसाठी सादिकचा नंबर लागायचा नाही. त्याच्या बहिणीचा नवरा इप्तिकार म्हणून होता तो पण याच गँगमध्ये होता. इस्माइल मलबारी म्हणून दाऊदचा एक गँगस्टर होता. त्याला जाऊन हे दोघं भेटले आणि छोटा शकीलचा नंबर घेतला. छोटा शकीलला सादिकने सांगितलं की मला तुझ्या गँगमध्ये यायचं. त्यावर छोटा शकील म्हणाला तुला गवळीने पाठवलं नाही कशावरुन? सादिक कालिया म्हणाला तुम्ही सांगाल ते काम करतो. त्यावर छोटा शकील म्हणाला जा तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला ठार कर. सादिक म्हणाला हत्यार पाठवा. तर छोटा शकिल म्हणाला हत्यार नाही तुला त्याला चॉपरने मारायचं आहे. त्यावर सादिकने त्याच्या मेहुण्याला म्हणजेच बहिणीच्या नवऱ्याला चॉपरने ठार केलं. त्यानंतर तो छोटा शकील बरोबर दाऊदसाठी काम करु लागला.” ही माहिती प्रदपी शर्मांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली