मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील बामनवाडा परिसरातील महात्मा कबीर नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याच्या भूमिगत टाकीत एक मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. शौचालयाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीत हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बामनवाडा परिसरात पालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत मृतदेह सापडल्याच्या वृत्तामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. पालिकेने बांधलेले शौचालय निकृष्ट दर्जाचे असून शौचालय खचून मृतदेह टाकीत पडल्याचा आरोप सुरुवातीला नागरिकांनी केला होता. मात्र शौचालय सुस्थितीत असून मृतदेह बाजूच्या पाण्याच्या टाकीत आढळल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
हेही वाचा >>>मुंबई : नायर रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
सार्वजनिक शौचालय परिसरात सोमवारी अचानक असह्य दुर्गंधी येऊ लागली होती. शौचालयाच्या बाजूच्या पाण्याच्या भूमिगत टाकीचे झाकणे थोडे हललेले होते व त्यात एक मृतदेह आढळला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला व पुढील तपास सुरू आहे. परिसरातील एका महिलेने आपला पती हरवल्याची तक्रार १५ डिसेंबर रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात नोंदवली होती. ही व्यक्ती पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळली. ही व्यक्ती पाण्याच्या टाकीत पडली किंवा त्याची हत्या करून मृतदेह टाकीत टाकण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहेत.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे शौचालय खचून नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. मात्र हे शौचालय खचलेले नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. हे शौचालय नुकतेच पालिकेने बांधले होते व खासगी संस्थेला चालवण्यास दिले होते. मात्र परिसरातील नागरिकांनी पैसे न दिल्यामुळे संस्थेने देखभालीचे काम बंद केले होते, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.