मुंबई : संचमान्यता ठरविण्यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची संख्या ३० सप्टेंबरपर्यंत यू-डायसवर नोंदविण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या. मात्र इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यू-डायसवर नोंदणीसाठी कोणतीही तरतूरद करण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात शाळांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली असून विद्यार्थ्यांची १७ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याच्या सूचना शाळांना केली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची यू-डायसवर नोंदणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यानुसार इयत्ता पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरळीतरित्या पूर्ण करण्यात येत आहे. मात्र कधीच शाळेत न गेल्याने वयोमानानुसार थेट इयत्ता दुसरी ते बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी यू-डायसवर कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा प्रशासनाला या विद्यार्थ्यांची नोंदणी करताना अडचणी येत होत्या.

अशा विद्यार्थ्यांची यूडायसवर तपशीलासह नोंदणी करता यावी, यासाठी अनेक शाळांनी विनंती केली आहे. अचूक आणि समावेशक डेटा संकलित व्हावा यासाठी या विद्यार्थ्यांची यू डायसवर नोंदणी होणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन शाळाबाह्य ठरलेल्या या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर नोंदणी सुविधा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा १७ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षक संचमान्यता निश्चित होणार आहे. त्यामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांची व ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची ३० सप्टेंबरपर्यंत यू डायसवर नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यातच आता इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची तरतूद केल्याने शिक्षकांची नियुक्ती विद्यार्थ्यांच्या अचूक माहितीवर करणे शक्य होणार आहे.

ड्रॉपबॉक्समध्ये ९ लाख २७ हजार विद्यार्थी शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये यू-डायस प्रणालीतील ड्रॉपबॉक्समध्ये राज्यातील तब्बल ९ लाख २७ हजार ४१४ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याच्या माहितीची देवाणघेवाण ड्रॉपबॉक्समार्फत केली जाते. २०२४-२५ मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी तातडीने ड्रॉपबॉक्समधून घेण्याचे काम शाळांनी तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने केली आहे. अशा विद्यार्थ्यांची पुन्हा नोंदणी केली जाणार नाही,अशी सूचना करण्यात आली आहे.