मुंबई : ‘चित्रपट क्षेत्रात कायम आतले आणि बाहेरचे हा वाद सुरू असतो, जो मला अजिबात पटत नाही’, असे स्पष्ट मत अभिनेता शाहरुख खान याने वेव्हज परिषदेत झालेल्या परिसंवादात व्यक्त केले. ‘द जर्नी : फ्रॉम आऊटसायडर टु रुलर’ या विषयावरील परिसंवादात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याशी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने संवाद साधला.
कोणताही पाठीराखा नसताना चित्रपटसृष्टीत नायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या शाहरुख खान याने गेली काही वर्षे सातत्याने सुरू असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षरीत्या भाष्य केले. कोणत्याही क्षेत्रात होणारी आतले आणि बाहेरचे ही विभागणी मला पटत नाही. अमुक एक चित्रपटसृष्टीतला आहे किंवा तो बाहेरचा आहे, अशा पद्धतीने लोक तुमच्यावर लेबल लावतात, पण खरी समस्या ही नाही.
लोक तुमच्याविषयी काय बोलतात, यापेक्षा तुम्हाला तुमच्या क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची किती ईर्ष्या आहे हे महत्त्वाचे ठरते. इथे कोणीही तुमची काळजी करायला बसलेले नाही. पुढे जाण्यासाठी तुम्ही किती आसूसलेले आहात, तुमचा निश्चय, तुमचे प्रयत्नच तुम्हाला एखाद्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करतात, असे शाहरुखने या वेळी सांगितले.
या वेळी स्वत:चा अनुभव सांगताना, मी जेव्हा या चित्रपटक्षेत्रात आलो तेव्हा हेच माझे विश्व आहे, अशी माझी ठाम धारणा होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील लोकांनीही खुल्या दिलाने माझे स्वागत केले, असे सांगत तुम्ही स्व-प्रयत्नानेच आणि स्वबळावरच ओळख निर्माण करू शकता, ही बाब त्याने अधोरेखित केली.
हार न मानता संघर्ष करत राहायला हवा : दीपिका पदुकोण
आजवरच्या वाटचालीकडे पाहात असताना एका १८ वर्षांच्या तरुणीसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणे ही फार मोठी गोष्ट होती. सातत्याने काम करत चुकता चुकता सगळे शिकत गेले, अशी आठवण अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सांगितली. या क्षेत्रात वावरताना अपयश आले तरी हार न मानता संघर्ष करत राहायला हवा. स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करायला हवी, असे सांगतानाच कितीही यशस्वी झाले तरी माझे कुटुंबीय कायम मला जमिनीवर ठेवतात, असेही तिने सांगितले. सध्या आई म्हणून जबाबदारी मोठी असल्याने बराचसा वेळ मुलगी दुआच्या मागे जातो, असेही तिने सांगितले.
चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीने विचार करताना अधिकाधिक चित्रपटगृहांची त्यातही छोट्या शहरांमधून आणि गावांमधून स्वस्तात चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या छोटेखानी चित्रपटगृहांची आज अधिक गरज आहे, तरच चित्रपट देशभरातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतील.
–शाहरुख खान, अभिनेता