काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी झाले होते. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपले, असा दावा शिंदे गटातचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. दरम्यान, त्यांच्या या दाव्यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- ४ दिवसांसाठी ४० कोटी: डाव्होस दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

दीपक केसरकर काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्होस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना केसरकर यांनी मुख्यमंत्री डाव्होस दौऱ्यादरम्यान केवळ चार तास झोपले, असा दावा केला. “डाव्होस दौऱ्यात हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, अशा वेळी मुख्यमंत्र्यांचं डाव्होसमध्ये अनुपस्थित राहणं योग्य नव्हतं. हा पंतप्रधान मोदींचा अपमान ठरला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि यावेळी ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले”, असं केसरकर म्हणाले.

हेही वाचा- Escort Service in Davos: डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी; अतिश्रीमंतांनी केलं ‘जीवाचं डाव्होस’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपालाही प्रत्युतर दिलं. डाव्होसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. हा सर्व खर्च राज्यावर आला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. जगभरातील लोक डाव्होसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत.”