मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत यंदा प्रथमच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंबाने सुरूवात झाल्याने त्याचा परिणाम प्रवेशावर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने नियमित फेऱ्यांमध्ये ३० ते ४० जागांवरच प्रवेश झाले. परिणामी, हा अभ्यासक्रम कसा राबवायचा, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. या अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेला २८ व २९ मेपासून सुरूवात होत आहे. या फेरीमध्ये तरी विद्यार्थी मिळतील का असा प्रश्न महाविद्यालयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योग सायन्स हा अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आला. बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या अभ्यासक्रमामध्ये निसर्गोपचार आणि योग यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम नैसर्गिक उपचार पद्धती, योग आणि आधुनिक विज्ञानाचा समन्वय साधणारा असून, या अभ्यासक्रमाचे स्वरुप साडेचार वर्षांचा अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप असे आहे.
राज्यातील तीन महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एक सरकारी, तर दोन खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली. मात्र नियमित फेऱ्यानंतरही या अभ्यासक्रमांला प्रवेश घेण्याकडे फार कमी विद्यार्थ्यांनी लक्ष दिले. नियमित फेऱ्यांमध्ये ३० ते ४० जागांवरच प्रवेश झाले. त्यामुळे विलंबाने प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा फटका या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. नियमित फेऱ्यानंतर आता संस्थास्तरावरील प्रवेश फेरी २८ मेपासून सुरू करण्यात येत आहे. या फेरीचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र या फेरीमध्येही विद्यार्थी उपलब्ध होतील का, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी – २८, २९ मे
नोंदणी शुल्क भरणे – २८, २९ मे
संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करणे – २८, २९ मे
रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे – २९ मे
पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे – ३० मे
पात्र इच्छुक उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात अर्ज करणे – ३१ मे ते ३ जून
गुणवत्ता यादी जाहीर – ३ जून (सायंकाळी ६ वाजता)
प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेणे – ४ ते ७ जून
रिक्त जागा आणि प्रतीक्षायादी जाहीर – ७ जून (सायंकाळी ६ वाजता)
प्रतीक्षायादीतून गुणवत्तेच्या आधारे रिक्त जागा भरणे – ८ जून