मुंबई : सर्वत्र गोपाळकाला उत्साहात साजरा होता असताना शनिवारी लोअर परळ येथे औषधांच्या देय रकमेवरून झालेल्या वादातून डिलेव्हरीबॉयवर गोळीबार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून बँकेत काम करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. गुन्ह्यांत एअरगनचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत असून बॅलेस्टिक चाचणीसाठी न्यायावैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
तक्रारदार १७ वर्षांचा असून माहिम येथील कापड बाजार परिसरातील रहिवासी आहे. तो ऑनलाईन औषध वितरण कंपनीत डिलेव्हरीबॉय म्हणून काम करतो. आरोपी सौरभकुमार अभिनाश सिंह लोअर परळ येथील हनुमान गल्लीतील प्रकाश कॉटन मिलच्या ८ व्या मजल्यावर राहतो. तो बँकेत कामाला असून त्याने ऑनलाईन औषधे मागवली होती. त्यानुसार तक्रारदार मुलगा औषधांची डिलेव्हरी घेऊन शनिवारी आरोपी सिंहच्या घरी आला. औषधे मागवण्यासाठी कॅश ऑन डिलेव्हरी असा पर्याय निवडण्यात आला होता. त्यावेळी आरोपीने तपासणी केली असता त्याने मागवल्यापेक्षा कमी औषधे आल्याचे वाटले. त्यामुळे त्याने तक्रारदार डिलेव्हरी बॉयला औषधांचे पूर्ण पैसे देण्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यात वाद झाला.
अखेर आरोपी सिंहने दरवाजा बंद केला. त्यानंतरही तक्रारदार डिलेव्हरी बॉय बाहेरून रकमेची मागणी करत होता. त्याने वारंवार दरवाजाची बेल वाजवली. त्यातून संतापलेल्या सिंहने घरातून काळ्या रंगाची मोठी बंदूक आणली व डिलेव्हरी बॉयच्या छातीला लावली, असा आरोप आहे. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ करत, इथून निघून जा. नाहीतर इथेच गोळी घालेन, चल पळ इथून असे धमकावले. त्यावेळी संपालेल्या सिंहने तक्रारदाराच्या दिशेने बंदुकील गोळीही झाडली.
याप्रकरणी डिलेव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी भारतीय न्याया संहिता कलम १०९, १२५, ३५१(२), ३५२ सह भारतीय शस्त्र अधिनियम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी आरोपी सिंहला अटक करण्यात आली. आरोपीने तक्रारदाराच्या छातीला बंदुल लावली होती. तेथून गोळीबार झाल्यानंतर त्याला गंभीर इजा होऊ शकते, तसेच त्याचा जीवही जाऊ शकतो, ही बाब आरोपीच्या लक्षात होती. त्यानंतरही त्याने हे कृत्य केले. त्यामुळे याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.