मुंबई : मुंबईतील  वांद्रे पूर्व परिसरात उभारण्यात आलेला पहिला स्कायवॉक धोकादायक स्थितीत असून या स्कायवॉकच्या एसआरए इमारत ते कलानगरदरम्यानच्या भागाच्या पाडकामास अखेर मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली. स्कायवॉकचे पाडकाम रात्रीच्या वेळी करण्यात येत असून महिन्याभरात ते पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) स्कायवॉकच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : सोसायटीच्या आवारात साचलेल्या नाल्याच्या पाण्यात अळ्यांची पैदास; सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दोषी ठरवून दंडात्मक शिक्षा

एमएमआरडीएने २००८ मध्ये बांधलेल्या स्कायवॉकचा द्रुतगती मार्गावरील भाग एमएमआरडीएने कलानगर ते वांद्रे-वरळी सागरीसेतू उन्नत मार्गासाठी पाडला. त्यामुळे  वांद्रे स्थानक ते कलानगर हा टप्पा पादचाऱ्यांसाठी बंद झाला. त्याचबरोबर वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालय या टप्प्याची दुरवस्था झाली आहे. स्कायवॉकचे दोन्ही टप्पे धोकादायक झाले असून या संपूर्ण स्कायवॉकची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्कायवॉकच्या पुनर्बांधणीचे काम एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका करणार आहे.  एसआरए ते कलानगर भागाचे काम एमएमआरडीए, तर वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते भास्कर न्यायालय भागाचे  काम मुंबई महानगरपालिका करीत आहे. मात्र या दोन्ही भागाचे पाडकाम महानगरपालिकाच करणार असून रेल्वे स्थानक ते भास्कर न्यायालयदरम्यानचे पाडकाम याआधीच पूर्ण झाले आहे. आता महानगरपालिका २५ ऑगस्टपासून एमएमआरडीएच्या भागाचे पाडकाम सुरू करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या स्कायवॉकटे काम रात्रीच्या वेळी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ४ दरम्यान पाडकाम करण्यात येत आहे. आतापर्यंत स्लॅब तोडण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम झाल्यानंतर स्कायवॉकचा लोखंडी सांगाडा हटविण्यात येणार आहे. संपूर्ण पाडकाम पूर्ण होण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीए निविदा प्रक्रिया राबवून स्कायवॉकच्या पुनर्बांधणीस सुरुवात करणार आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.