रुग्णसंख्येत चौपटीहून अधिक वाढ

मुंबई:  करोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: डेंग्यूचा साथ पसरत चालली असून तापाने मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपटीने वाढली आहे.

शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून येणाऱ्या या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मच्छरांची पैदास वाढली असून त्यामुळे गेल्या महिनाभरात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे ३७ रुग्ण होते. ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता १३२ वर गेली आहे. जानेवारी ते ऑगस्ट डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या २०९ झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १२९ होते. परंतु २०१९ च्या तुलनेत मात्र कमी आहे. हिवतापाच्या रुग्णांची संख्याही किचिंत वाढली असून ऑगस्टमध्ये ७९० रुग्ण आढळले आहेत.

डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी(बी), परळ(एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम(एच पश्चिम) या भागात आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने १३ लाख १५ हजार ३७३ घरांची पाहणी केली असून ११ हजार ४९२ डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केली आहेत.