गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दुपटीने वाढल्याने खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी शाळांसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. वर्ग सुरू होण्यापूर्वी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करा, असे आदेश शाळांच्या मुख्याध्यापकांना काढले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूची अधिक लागण झाल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडय़ानुसार ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये आतापर्यंत डेंग्यूचे तब्बल १९६ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ६८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा बराच मोठा असल्याची स्पष्ट कबुली आरोग्य विभागाचे अधिकारी देत असले तरी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा आकडा यापेक्षाही अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ठाण्यातील किसननगर, कळवा, मुंब्रा यांसारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये डेंग्यूने आजारी असलेले रुग्ण मोठय़ा संख्येने सापडत आहेत. हे लक्षात घेऊन महापालिकेने वेगवेगळ्या स्तरावर डास निर्मूलनाची मोहीम सुरू केली असून सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांकडेही आपला मोर्चा वळविला आहे.
‘स्वच्छता मोहीम हाती घ्या’
महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी सायंकाळी शहरातील सर्व शाळांच्या व्यवस्थापनांसाठी परिपत्रक काढले असून डेंग्यूपासून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्वच्छता मोहीम हाती घ्या, असे आवाहन केले आहे. शाळेच्या परिसरात शोध मोहीम हाती घ्या आणि डास उत्पत्तीस्थळे नष्ट करा, असे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्र यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये सर्वाधिक मृत्यू
राज्यातील पालिकांमध्ये झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या एकूण २१ मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू केवळ पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील आहेत. पुण्यात आणि पिंपरी- चिंचवडमध्ये प्रत्येकी ६ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात शुक्रवापर्यंत डेंग्यूचे तब्बल ३,११७ संशयित रुग्ण सापडले होते. डेंग्यूग्रस्तांच्या संख्येत सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरपासून घट होत असल्याचे पालिकेची आकडेवारी सांगते. तरीही रुग्णालये आणि नर्सिग होम्समधील डेंग्यू रुग्णांची झुंबड मात्र ओसरायचे नाव नाही.