मुंबई: विरोधी पक्ष हे लोकशाहीचे दुसरे चाक आहे पण हे चाक सध्या पंक्चर झाले आहे. ज्यांना संपलेला पक्ष म्हटले. त्यांच्या मागे ‘चल मेरे भाई’ म्हणत जाण्याची वेळ आली. ‘एकतर तू राहशील नाहीतर मी’ असे म्हणणाऱ्यांना फडणवीसांच्या मागे जावे लागत आहे. संघाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या देत फडणवीस यांच्यामागे जाणाऱ्यांचा केमिकल लाेचा झाला असे दिसते, एवढया लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतीम आठवडा प्रस्तावाला शिंदे यांनी उत्तर दिले. तीन वर्षे मला शिव्या शाप देण्यात गेली. आम्ही ताटात माती कालवली नाही. २०१९ मधील विधानसभा निकालानंतर फडणवीस यांनी ५० फोन केले पण ते फोन उचलेले गेले नाहीत. राज्याने युतीला कौल दिला असताना फडणवीस यांच्या पाठित खंजीर खूपसला. सर्व हिशोब इथेच चुकवावे लागतात, फडणवीस यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरे पक्षांचा महापौर होऊ शकला होता. ती कृतज्ञता न ठेवता कृतघ्नता केली गेली.असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. आमचा द्वेष, तिरस्कार कराल तेवढी जनता आमच्यावर प्रेम करणार आहे. ‘जरा संभलकर करिये औरो से हमारी बुराई आप जिन्हे जाकर बताते हे वही हमे आकर सब बताते है’ अशी शेरो शायरी करत शिंदे यांनी फडणवीस यांच्याबरोबर उध्दव ठाकरे यांची होणारी चर्चा समजते असे एक अर्थाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन वर्षापूर्वी आम्ही गुवाहटीला होतो. तेव्हा ह्यांनी दिल्लीला संधान बांधले होते. ‘त्यांना घेण्याऐवजी आम्हाला सोबत घ्या’ असे भाजप नेत्यांना सांगत होते, असा गोप्यस्फोट शिंदे यांनी केला. पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. मोदी यांच्यावरील आकसामुळे पुरस्कार देण्याच्या मुंबईतील कार्यक्रमाला हे गेले तर नाहीच पण लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाला देण्यात येणारा भूखंड रद्द केला असा आरोप शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केला. सोन्याचा चमचा कुणाला उद्देशून बोललो नव्हतो पण ते कोणाला तरी लागले. आम्ही सत्ता सोडून गेलो होतो. आम्ही देणारे आहोत. कोव्हिड रुग्णांचे घास कोणी काढून घेतले हे महाराष्ट्राला माहित आहे असे शिंदे यांनी ठाकरे यांना डिवचले.