मुंबई : काश्मीरमधील पर्यटन संपुष्टात आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असून हा हेतू सफल होणार नाही. पहलगाम हल्यानंतर काश्मीरमध्ये भीती व चिंतेचे रण होते. ते आता पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक काश्मीर मध्ये जात आहेत. काश्मीरमधील रेल्वे, रस्ते यांचा विकास स्थानिक जनतेला रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. येथील जनतेला दहशतवाद नको आहे. काश्मिर मधील पर्यटन वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मिर मध्ये व्यक्त केला.
‘ऑपरेशन विजय’ च्या २६ व्या विजयोत्सवानिमित्ताने भारतीय सैन्यदल आणि सरहद संस्थेच्या वतीने द्रास,कारगील येथे भागात ‘सरहद शौर्यथाॅन २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. कारगिल युद्धात भारतीय सैन्यदलाने गाजविलेल्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने द्रास येथे तयार करण्यात येत असलेल्या ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारतर्फे तीन कोटी रुपयांचा निधी शिंदे यांनी रविवारी भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री असताना घो,णा केली होती. कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘सरहद शौर्यथॉन-२०२५’ या स्पर्धेचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि भारतीय सैन्यदलातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते