मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर शुक्रवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासवर फुटले. मात्र, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. डॉ. गोऱ्हे सोलापूरहून पुण्याकडे निघाल्या असताना ही घटना घडली. नीलम गोऱ्हे सुखरूप आहेत.
खड्ड्यांमुळे जनतेचा जीव धोक्यात
टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीनंतर प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटले. यामुळे या रस्त्यावरील गंभीर स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची गरज आहे ते रस्त्यावरील खड्डे लोकांच्या जीवावर बेतत आहेत.
तातडीची पावले उचलण्याचे निर्देश
टेंभुर्णी बायपास वरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटल्याचे घटना समोर आल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे सुखरूप
या प्रसंगात डॉ. नीलम गोऱ्हे पूर्णपणे सुखरूप असून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे. अपघातानंतर नीलम गोऱ्हे यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. अन्य वाहनांची टायर फुटल्याची घटना घडल्यामुळे त्यांनी परिसरातील रस्त्यावर खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. नीलम गोऱ्हे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची दखल घेऊन ते बुजविण्याचे निर्देश दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.