मुंबई : गणेशोत्सव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मागील ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले. परिणामी, पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाला असला तरी मागील दोन महिन्यांमध्ये रक्तदान शिबिरांच्या आयोजनामध्ये घट झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये जवळपास १ हजार १०१ पिशव्या इतके रक्त शिल्लक आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांना रेल्वे स्थानके व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रक्तदान शिबिरांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. त्यामुळे रक्तदानानासाठी युवा वर्ग महत्त्वाचा स्त्रोत समजला जातो. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयांना सुट्या असल्याने, तसेच दिवाळीनिमित्त शाळांनाही सुट्या असल्याने अनेक रक्तदाते बाहेरगाीव किंवा परराज्यामध्ये जातात. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या फारच कमी होते. त्यातच यंदा गणेशोत्सवापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. तसेच एकदा रक्तदान केल्यानंतर तीन महिने रक्तदान करता येत नसल्याने रक्तदात्यांची संख्याही कमी झाली आहे.
परिणामी, मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील विविध सरकारी रक्तपेढ्यांमध्ये फारच कमी रक्तसाठा उपलब्ध आहे. मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये जवळपास १ हजार १०१ पिशव्या रक्त शिल्लक आहे. टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सर्वाधिक ५१८ पिशव्या रक्त उपलब्ध आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये १९३ पिशव्या, शीव रुग्णालयामध्ये १४९ पिशव्या, नायर रुग्णालयामध्ये १०५ पिशव्या, राजावाडी रुग्णालयामध्ये १२, कांदिवली शताब्दीमध्ये ६ आणि वांद्रे भाभा रुग्णालयामध्ये १ पिशवी रक्त शिल्लक आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या जे.जे. रुग्णालयामध्ये ७४ पिशव्या, जे.जे. महानगरमध्ये १९, सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये १३, कामा रुग्णालयामध्ये ९ आणि जी.टी. रुग्णालयामध्ये २ पिशव्या रक्त शिल्लक आहे. सरकारी रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असलेले रक्त पुढील काही दिवस पुरण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना त्यांच्या उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याचा आढावा घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था आदींशी संपर्क साधून गरजेप्रमाणे स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच मुंबईतील शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. त्याचबरोबरच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डाॅ. पुरुषोत्तम पुरी यांनी दिल्या आहेत.
