मुंबई: पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद गुरुवारी विधानसभेतही उमटले. कसब्यातील निकालावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचत आत्मचिंतनाचा सल्ला दिला. तर तीन राज्यांतील निकालात काँग्रेस कुठे दिसतच नाही. त्यामुळे असा एखादा विजय तुम्हाला सभागृहात साजरा करावा लागतो. त्यामुळे आमच्याप्रमाणे तुम्हीही आत्मचिंतन करा, असा प्रतिटोला फडणवीस यांनी लगावला.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावर सकाळपासून विधान भवनात सत्ताधारी आणि विरोधकांचे दावे प्रतिदावे सुरू होते. विधानसभेत कामकाज सुरू असतानाही बहुतांश सदस्यांच्या नजरा कसबा पोटनिवडणुकीतील निकालाकडे लागल्या होत्या. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी या निवडणुकीवरून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना डिवचले. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना भुजबळ यांनी बाहेर पुण्यात मतमोजणी सुरू आहे, पण येथील अनेक जण मानसिक दबावाखाली आहेत. सभागृहात कामकाजात सहभागी झाले असले तरी त्यांचे मन तिकडे असल्याचे सांगत पाटील यांना डिवचले. त्यावर पाटील यांनीही नाना पटोले खूप रिलॅक्स झाले असले तरी आपल्यावर कसलाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकालाचा मानसिक दबाव नसल्याचे सांगितले.

कसब्याचा निकाल लागताच नाना पटोले यांनी सभागृहाला या निकालाची माहिती देताना, कसबा येथे भाजपचा हजारो मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा टोला लगावला. तसेच काँग्रेसच्या निवडून आलेल्या नव्या सदस्याला विधानसभेत जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. लागलीच फडणवीस यांनीही पटोले यांचे अभिनंदन करीत हा निकाल आम्ही स्वीकारतो. पण फक्त कसबाचा निकाल पाहू नका. तीन राज्यांचा निकाल पाहा. तिथे काँग्रेस दिसतही नाही. त्यामुळे कुठेतरी एखादा निकाल लागला म्हणून तो सभागृहात सांगण्याची गरज आम्हाला लागत नाही. कसबा येथे जो काही निकाल आला आहे त्याचे थोडे आत्मचिंतन आम्ही करू, थोडे आत्मचिंतन तुम्ही करा, असा टोला फडणवीस यांनी लावला.