“हे कोणाच्या बापाच्या मालकीचे…”; किरीट सोमय्यांना पाठवलेल्या नोटीशीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर संताप व्यक्त केला.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिला. आपल्या देशाची सातत्याने प्रगती होवो आणि आपली लोकशाही चिरायू होवो, असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने पुढे जातोय, त्यावरून देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर संताप व्यक्त केला.

किरीट सोमय्यांना नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, की “या सरकारचं डोकं फिरलंय. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर सर्वांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारामध्ये कुठल्याही ऑफिसमध्ये रितसर जाऊन तपासणी करण्याचा अधिकार कुठल्याही सामान्य नागरिकाला आहे. तोच अधिकार बजावण्यासाठी किरीट सोमय्या गेले होते. कागदपत्रांची पडताळणी करताना खुर्चीवर बसणं हा देखील अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे, कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही, मी जाणीवपूर्वक कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही, हे शब्द वापरत आहे, कारण ज्या प्रकारे नोटीशी दिल्या जात आहेत, जणूकाही खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे मी हे शब्द वापरत आहे.”

“किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोणत्या अधिकारातून तुम्ही नोटीस पाठवली असा सवाल त्यांनी केला. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, ते नेमकं कोणी काढलं हे रेकॉर्ड झालंय. ज्यांनी हा फोटो काढला तेच तक्रारदार आहेत, ही सर्व मिलीभगत आहे, चोरी करायची आणि कोणी उघड करायचा प्रयत्न केला तर, त्याला बदनाम करायचं हे खपवून घेतलं जाणार नाही,” असं फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनाधिकृत बांधकामास पालिकेने लावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत सोमय्या यांनी माहिती अधिकारात नगरविकास विभागाकडे या निर्णयासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यानुसार  नगरविकास विभागाने सोमय्या यांना सोमवारी १.२० वाजता फाइल अवलोकनासाठी बोलाविले होते. सोमय्या यांनी नगर विकास विभागातील कक्ष क्रमांक ११६ मध्ये जाऊन काही फाइल्स तपासल्या. त्या वेळी ते शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स बघत होते. त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरल्यावर वादाला तोंड फुटले आहे. सोमय्या यांनी कोणत्या फाइल्स कोणत्या अधिकारात तपासल्या, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता का, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत ते का बसले होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोमय्या यांनी अधिकऱ्यांच्या खूर्चीत बसून फाइल चाळणे आणि त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याप्रकरणी  एक कक्ष अधिकारी आणि दोन नगरनियोजन अधिकारी अशा तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  त्याचप्रमाणे  सरकारने सोमय्या यांनाही नोटीस बजावली असून कार्यालयात फाइलीचे अवलोकन करीत असताना अधिकाऱ्यांची छायाचित्रे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणे ही कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून अनुचित असल्याने, सदर कृतीबद्दल दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश सोमय्या यांना देण्यात आले असून तसे पत्रही पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadanvis reaction on kirit somaiya notice hrc

Next Story
व्यंगचित्रावरून सेना-भाजपमध्ये खडाखडी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी