बरीच टीकाटिप्पणी झाल्यानंतर अन्य मागासवर्गीयांसाठीच्या खात्याला नवीन मंत्री देणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले. ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे या अधिक ताकदवान होऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे खाते त्यांनी स्वत:कडे ठेवल्याची चर्चा सुरू झाली होती. पण आता नवीन मंत्र्यांकडे हे खाते सोपविणार असल्याचे त्यांनीच सांगितल्याने ते पंकजा मुंडेंकडे खाते देणार की अन्य कोणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता आहे.
ओबीसींसाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस यांचा मुंबई भाजपकडून वांद्रे येथे सत्कार करण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या खात्याला स्वतंत्र मंत्री देणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी अध्यक्ष आशीष शेलार, खासदार पूनम महाजन, भाई गिरकर आदी उपस्थित होते.