मुंबई : भिवंडी क्षेत्रात असणाऱ्या शेकडो गोदामांची एमएमआरडीएच्या पथकाकडून तपासणी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. भिवंडीत अनधिकृत गोदामांना परवानगी देणाऱ्या सरपंच आणि ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत गोदामांवर वर लवकरच एमएमआरडीएचा हातोडा पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून एक प्रकारे सत्तेतील “ठाणेकरांच्या” ठाण्यावर हल्ला केला आहे.
भिवंडी येथील अंजूर फाटा दापोडा रस्तावर वळ गावच्या हद्दीतील एका गोदामाला १४ जून रोजी भीषण आग लागून आजुबाजूची बारा इतर गोदामे जळून खाक झाली. आग लागलेल्या गोदामात रासायनिक ड्रम व पावडर होती. मोठ्या प्रमाणात असलेल्या बेकायदेशीर गोदामा मुळे अग्निशमन दलाला या ठिकाणी पोहचण्यास दीड तास विलंब लागला. त्यामुळे इतर गोदामे नाहक जळून खाक झाली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आजुबाजूला पसरले होते. श्वसनाचे आजार होतात. बेकायदेशीर गोदामा मुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची लक्षवेधी आमदार ॲड निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. भिवंडी सारख्या पालिका क्षेत्रात बेकायदेशीर गोदाम बांधताना स्थानिक गावातील ग्रामपंचायतीच्या पावत्या फाडून अनधिकृत गोदाम उभारली जात आहेत.
गोदामांची व्यापारा साठी आवश्यकता आहे पण त्यासाठी बेकायदेशीर गोदाम मान्य केली जाणार नाहीत. अशी गोदामे नियमित करण्यासाठी सरकारने धोरण जाहीर केले होते. काही जणांनी या योजनेचा फायदा घेतला पण काही जणांना कायद्याची भीती राहिली नाही. ही बेकायदेशीर गोदाम तोडून टाकली जातील. परवानगी देणाऱ्या सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या गोदामांची सॅटॅलाइट सर्वक्षण करून नियंत्रण ठेवले जाणार आहे. ह्या सर्व गोदामांची एमएमआरडीए पथकाकडून तपासणी केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.