Devendra Fadnavis on Dadar Hanuman Mandir: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात दादरमधील हनुमान मंदिराचा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन मुद्दा उपस्थित केल्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करण्यात आल्यामुळे या मंदिराचं नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर एकीकडे मंगलप्रभात लोढा यांनी मंदिराला आलेली नोटीस स्थगित केल्याचं सांगितलं असताना दुसरीकडे मंदिर नियमितीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे.

नेमका काय आहे वाद?

दादर स्थानकावर पुनर्विकासाची कामं करण्याचा प्रकल्प रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे. त्यायचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या पूर्वेकडे असणारं जवळपास ८० वर्षं जुनं हनुमान मंदिर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मंदिर प्रशासनाला रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र, याला स्थानिकांबरोबरच राजकीय विरोधकांनीही तीव्र विरोध केला. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या नोटिशीबद्दल सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली.

नोटिशीला स्थगिती

दरम्यान, नोटिशीचा मुद्दा तापल्यानंतर भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नोटिशीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती माध्यमांना दिली. तसेच, गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्कात असून मंदिराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचं लोढा म्हणाले.

Dadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाबाबत मोठी माहिती, मंगलप्रभात लोढा म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी मांडली सविस्तर भूमिका

या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये आयोजित पुस्तक महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “न्यायालयाने याआधी निर्णय देऊन मंदिरांच्या श्रेणी केल्या आहेत. जुनी मंदिरं त्या श्रेणीनुसार नियमित करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून आम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढू. नियमातील तरतुदीनुसार त्या मंदिराचं नियमितीकरण आपण करून घेऊ”, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे दादरमधील या मंदिराचंही नियमितीकरण होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.