ओडिशामधील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी (२ जून) रात्री कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात २३८ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. ते शनिवारी (३ जून) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांशी आमच्या सहवेदना आहेत. आम्ही मृतांना श्रद्धांजली देतो. तसेच देवाला प्रार्थना करतो की, मृतांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. जे लोक जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत अशीही आम्ही प्रार्थना करतो.”

“गृहखातं बालतस्करीच्या प्रश्नावर संवेदनशील”

बालतस्करीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गृहखातं बालतस्करीच्या प्रश्नावर संवेदनशील आहे. आम्ही सातत्याने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. महाराष्ट्राने बालतस्करीवर जेवढी कारवाई केली तेवढी कुठेही झालेली नाही. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत हे प्रकार रोखण्याचं काम राज्य सरकार करत आहे.”

“बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही खूप संवेदनशील”

बेपत्ता महिला आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही खूप संवेदनशील आहोत. आकडे पाहिले तर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात या महिलांचा शोध घेण्याचं प्रमाण ९० टक्के आहे. काही ठिकाणी तर हे प्रमाण ९५ टक्के आहे. असं असलं तरी यात अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे.”

“दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा”

“दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसला पाहिजे. मात्र, सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासनं देऊन लग्नं केली जात आहेत. ज्या लोकांचं आधीच लग्न झालं आहे ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यावरून लव्ह जिहादच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत, असं दिसत आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Coromandel Express Accident Live : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ओडिशा दौऱ्यावर, जखमींची विचारपूस करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्य सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग”

“राज्य सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग आहे. आम्ही यावर कायदा तयार करण्याचा विचार करत आहोत. आम्ही सध्या वेगवेगळ्या राज्यातील कायद्यांचा अभ्यास करत आहोत,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.