मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र, मुंबई महापालिका, राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर आता शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन भेट घेत चर्चा केली आहे. तसेच योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत एकीकडे मुसळधार पाऊस पडला. तर दुसरीकडे समुद्राला भरती आल्यामुळे उंच लाटा उसळत आहेत. या अनुषंगाने प्रशासनाकडून योग्य त्या उपयायोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत मुंबईकरांना आवश्यक असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन केलं आहे.

हेही वाचा : “…म्हणून मुंबईतील पावसात मंत्री, आमदार अडकले”, वडेट्टीवारांचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांना चिमटा

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?

“जेव्हा भरती आणि मुसळधार पाऊस दोन्ही एकत्र येतात. तेव्हा पाण्याची परिस्थिती अधिक कठीण होते. तसेच पोलीस विभागासह संपूर्ण स्थानिक आणि राज्य प्रशासन मदतीसाठी प्रयत्नशील आहे. कृपया आवश्यक असेल तरच बाहेर पडा. मुंबईकरांनो सुरक्षित राहा, काळजी घ्या!”, असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबईस मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, कुलाबा आणि भायखळा परिसरात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर उपनगरातील अंधेरी, वांद्रे परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई बरोबरच नवी मुंबई परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.