मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; अन्य मंत्र्यांना विनाचौकशी अभय

विनोद तावडे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, जयकुमार रावळ, डॉ. रणजित पाटील आदी मंत्र्यांच्या विरोधात आरोप झाल्यावर त्यांना विनाचौकशी अभय देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इमारतीच्या पुनर्विकासाकरिता जादा सवलत देण्याची शिफारस केल्याचा आरोप झालेल्या गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा सोमवारी विधानसभेत केली. गेल्या अडीच वर्षांच्या भाजप सरकारच्या कालावधीत एकनाथ खडसे यांच्यानंतर चौकशीला सामोरे जाणारे मेहता हे दुसरे मंत्री ठरले आहेत. चौकशीच्या काळात मेहता यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी विरोधकांनी केली.

दक्षिण मुंबईत एका मोठय़ा विकासकाला इमारतीच्या पुनर्विकासाकरिता जादा सवलत दिल्याचा आरोप मेहता यांच्यावर विरोधकांनी केला होता. विकासकाला जादा सवलत देण्याकरिता हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मेहता यांनी फाईलवर लिहिला होता. त्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मेहता यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. ‘मुख्यमंत्र्यांना अवगत करावे’, असे बहुधा मेहता यांना म्हणायचे असावे, असे उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच विरोधकांना आयतेच कोलित मिळाले.

गृहनिर्माण खात्याशी संदर्भात अधिकाऱ्यांसमावेत मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत काही इमारतींच्या प्रस्तावांवर चर्चा झाली होती. पण त्या फाईंलीमध्ये या इमारतीच्या फाईलचा समावेश नव्हता. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली असल्याने आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याप्रमाणे असा शेरा मारल्याचा खुलासा मेहता यांनी केला. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी मेहता यांना चांगलेच धारेवर धरले. आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मेहता यांनी २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच चटईक्षेत्र निर्देशांक अडीचवरून तीनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला. चव्हाण यांच्याच निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती. तसेच जादा चटईक्षेत्र नको अशी रहिवाशांनी मागणी केली होती याकडेही मेहता यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते, असा शेरा मुख्यमंत्र्यांना विचारून लिहिला होता की तसाच लिहिला यावर विरोधकांनी मेहता यांची चांगलीच कोंडी केली. शेरा लिहिला असला तरी पुढील कारवाई काहीच झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्या सर्वच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या परवानगीविना असे शेरे लिहून कामे करून घेतील. हे प्रकरण गंभीर असल्याचे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घोटाळ्यांची चौकशी निवृत्तीच्या काळात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी १३७ प्रकरणे मंजूर केली होती. त्याची सध्या छाननी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यात काही अनियमितता आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अन्य मंत्र्यांना वेगळा न्याय

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जयंत पाटील यांनी मेहता यांना कात्रीत पकडल्यावर त्यांनी आपण कोणत्याही चौकशीस तयार आहोत व मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी तयारी दर्शविली. आतापर्यंत विरोधकांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अन्य मंत्र्यांवर आरोप झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीची गरज नाही, असे सांगत सर्व मंत्र्यांना अभय दिले होते. मेहता यांनी चौकशीची मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीची घोषणा केली.

मेहता यांना शह

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे भाजपच्या दिल्लीतील उच्चपदस्थांच्या निकटचे मानले जातात. त्यातूनच काही प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले होते, अशी चर्चा आहे. संधी मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेहता यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले आहे. मेहता यांना योग्य तो संदेश देण्याकरिता फडणवीस यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.