मुंबई : दिवाळी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य जबाबदार अधिकारी सुट्टीवर गेल्यामुळे काही जिल्ह्यांतील अतिवृष्टी बाधितांना दिवाळीपूर्वी मदत मिळू शकली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वपक्षीय मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी मुख्य सचिवांना जाब विचारला. तातडीने मदत वितरणाची जबाबदारी मुख्य सचिवांची आहे. या विषयावर मला पुन्हा चर्चा करायला लावू नका, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना सुनावले.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला होता. सुमारे एक कोटी शेतकऱ्यांचे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ३१,६२८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत दिवाळी पूर्वी मदत देण्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली होती. आपत्ती आणि पुनर्वसन विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हालचाली करून दिवाळी पूर्वी मदत देण्यासाठी धडपड केली जात होती. पण, आजअखेर ३१,६२८ कोटी रुपयांपैकी फक्त आठ हजार कोटी रुपयांचीच रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय मंत्र्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने मदत निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करूनही केवळ जिल्हाधिकारी आणि जबाबदार अधिकारी दिवाळीसाठी सुट्टीवर गेल्यामुळे अतिवृष्टी बाधितांना वेळेत निधी मिळाला नाही, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेतला. काही अधिकारी ऐन दिवाळीतही काम करीत आहेत. तर काही अधिकारी दिवाळी झाल्यानंतर अजूनही कामावर परतले नाहीत. अधिकाऱ्यांनाच दिवाळी होती, आम्हाला दिवाळी नव्हती का. तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घ्या. निधी वितरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन तातडीने निधी वितरणाची सोय करा, असे आदेश फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले.
