मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होता. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला? आणि ६००० कोटी रुपयांचं काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी आज बिकेसी येथील मैदानाचा पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड, १५ वर्षांपूर्वीच्या खटल्यात अटक वॉरंट रद्द!

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“ज्यांचे संपूर्ण आयुष्य घोटाळे करण्यात गेलं, त्यांना सीमेंटचे रस्ते होत असल्याचं दुखं आहे. कारण सीमेंट कॉंक्रीटचे रस्ते झाले, तर पुढची ४० वर्ष नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढंच आतापर्यंत सुरू होतं. २०१८ साली जेव्हा चौकशी झाली, तेव्हा मुंबईतील २०० रस्त्यांमध्ये खालची पातळीच नव्हती. अशा प्रकारची कामं त्यांनी २५ वर्ष केली. आता त्यांच्या लक्षात येते आहे की, आपली दुकानदारी बंद करण्याचं काम हे काँक्रीट रस्ते करत आहेत, म्हणून त्यांची ओरड सुरू आहे, त्यांना आता मुंबईतील जनताच उत्तर देईल”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

हेही वाचा – दावोसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार; मुख्यमंत्री म्हणाले, “हे करार फक्त कागदावरच…”

“… तो अधिकार विरोधकांना नाही”

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धघाटन होणारी कामं ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. संदर्भातही देवेंद्र फडणीसांनी प्रतिक्रिया दिली. “हे झोपेत बोलणारे लोकं आहेत. मेट्रोचं भूमिपुजन पंतप्रधान मोदींनी केलं होतं, त्याचं उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. एसटीपीच्या संदर्भात मी स्वत: मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून परवानगी आणली होती. मात्र, टक्केवारी ठरली नाही म्हणून या लोकांनी वर्क ऑर्डर काढली नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर त्याचे वर्क ऑर्डर आम्ही काढलं. त्यामुळे ही कामं आमच्या काळात झाली हे म्हणायचा विरोधकांना अधिकार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पुणे : ३० कोटींच्या कर्ज मंजुरीच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक, मुंबईतील एकाच्या विरोधात गुन्हा

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “याबाबत मला कल्पना नाही. हा कार्यक्रम सरकार ठरवत नाही, त्यामुळे मला याबाबत माहिती नाही.”