मुंबई : मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू असून करोनासाथीच्या काळातही कोविड केंद्रांपासून ते विविध साहित्य खरेदींमध्येही भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम झाले. मुंबई मेली तरी चालेल, यांचे घर भरणे सुरू असून आम्ही त्यावर बोललो तर मुंबईचे, मराठीचे, महाराष्ट्राचे शत्रू ठरवतात; पण मुंबईचे खरे शत्रू कोण आहेत हे आता मराठी माणसाला कळले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन अफरातफर करून लोकांचा पैसा लुटून त्याचा उपयोग दहशतवादी कृत्यांपासून ते अमली पदार्थ व्यापार आदी गुन्ह्यांसाठी करणाऱ्या टोळीचा तपास पुणे पोलिसांनी अंतिम टप्प्यात आणला असताना तो बंद करण्याचा घाट कोणाच्या आदेशावरून घालण्यात आला, असा सवाल करत फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा विविध विषयांवर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आर्थिक व्यवस्थापनात ४५ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. केवळ लुटण्याचे काम सुरू आहे. कोविड केंद्रांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. पुण्यात १५ दिवसांत काळय़ा यादीत टाकलेल्या कंपनीला मुंबईत ५ कोविड केंद्रांची १०० कोटी रुपयांची कामे देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांना ३८ कोटी रुपये जादा देण्यात आले. तसेच प्राणवायू प्रकल्पांसाठी काम दिलेल्या तिन्ही कंपन्या काळय़ा यादीतील आहेत. ‘हायवे’ या कंपनीवर किती कृपा दाखवणार. पेंग्विन आणतात, पिंजरे बांधतात अशा कंपनीला प्राणवायू पुरवठय़ाचे काम दिले. या कंपनीने आपला जीएसटी क्रमांकही एका स्टोअरचा दिला, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मुंबईतील रुग्णालयांत गोळय़ा-औषधांचा चणचण आहे. इंजेक्शन खासगी दुकानांतून खरेदी करावी लागत आहेत, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. मुंबईतील बिल्डरांकडे २३०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असताना त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला.

मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील निविदेतही घोटाळा असल्याने ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.  देशात सर्वत्र सरासरी खर्च प्रति दशलक्ष लिटर १.७० कोटी रुपये असताना मुंबई पालिकेला प्रति दशलक्ष लिटर ७.४७ कोटी रुपयांची निविदा आल्याचे फडणवीस म्हणाले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने आमचेही या निविदा प्रक्रियेवर लक्ष आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

आणखी एक पेन ड्राइव्ह

मुंबई पोलीस दलातील इसाक बागवान हे निवृत्त अधिकारी आहेत. बारामती ते मुंबईपर्यंतची संपत्ती त्यांनी नोकरीत असताना इतरांच्या नावावर खरेदी केली. फरीद मोहम्मद अली याच्या नावानेही खरेदी झाली. तो दाऊदच्या संपर्कात होता व पुढे त्याचा मृत्यू झाला. या फरीदच्या मालकीची सारी मालमत्ता ही बागवान यांच्या नावे बक्षिसी देण्यात आली. इसाक बागवान यांच्या बंधूंचे स्टिंग ऑपरेशन झालेला एक पेन ड्राइव्ह असून त्यात मुंबईतील एका नेत्याने बागवान यांच्या प्रकरणांत मध्यस्थी केल्याचा संवाद या ध्वनिचित्रफितीत आहे. मी हा पेन ड्राइव्ह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सोपवत असून त्यांनी सत्यता पडताळून पाहावी, असे फडणवीस म्हणाले.

तपास का थांबविला?

अंबर हा पुण्यातील मूळ निवासी असून तो सध्या मीरा भाईंदरमध्ये राहतो. त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. सध्या तो ठाणे कारागृहात आहे. शफीक अन्सारी हा त्याचा सहकारी आणि तोही ठाणे कारागृहात. अंबर हा हवाला एजंटही असून दाऊद इब्राहिमसाठी तो पैसे फिरवतो. त्याच्यासह तिया सुनार, नीलेश शेट्टी, अर्पित चतुर्वेदी, प्रत्युशकुमार सिंग, निखिल कासबे ही एक संघटित टोळी असून ३०० हून अधिक सदस्य आठ राज्यांत काम करतात. अमली पदार्थ आणि पैशांची फिरवाफिरवी करतात. आयसीसचे काही हस्तक यात असल्याचा व दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याचाही संशय आहे. हे गंभीर प्रकरण असून पुणे पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण करत आणला असताना तो बंद करण्याचा घाट घातला जात आहे. कोणाच्या आदेशाने हे होत आहे, असा सवाल करत याचा एनआयएकडे तपास दिला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis targeting shiv sena over corruption
First published on: 25-03-2022 at 02:29 IST