वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे. भाजपाच्या याच धोरणामुळे कसबा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता लवकरच देशातही बदल होईल असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक टोला लगावत त्यांनी उत्तर दिलं. ४०-४० आमदार त्यांच्या नाकाखालून निघून गेले तरीही उद्धव ठाकरे बोध का घेत नाहीत? त्यांना आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“असं आहे की ४०-४० लोकं त्यांच्या नाकाखालून निघून गेले तरीही उद्धव ठाकरे काहीही बोध घेत नाहीत. अजूनही अशीच वक्तव्यं उद्धव ठाकरे करत आहेत. खरंतर आज सर्वात जास्त आत्मचिंतन करण्याची वेळ कुणावर आली आहे तर ती उद्धव ठाकरेंवर आहे. त्यांचं काय राहिलं? पुण्यात त्यांना उमेदवार दिला नाही. पिंपरीत त्यांना सीट मिळाली नाही. दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून किती दिवस पेढे वाटणार? म्हणजे ठीक आहे पण हे किती दिवस करणार? त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावं.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले त्याला काय अर्थ आहे? आम्ही अमेरिकेची निवडणूक जिंकू शकतो असाही दावा ते करू शकतात असंही देवेंद्र फडणवीस यांन म्हटलं आहे. असल्या फाल्तू गोष्टी कशाला विचारता असं म्हणत त्यांनी हसत उत्तर देणं टाळलं.

कसबा निवडणूक निकालावर काय म्हणाले फडणवीस?

सातत्याने जिंकणारे कधीतरी हरले तर त्याचीच चर्चा जास्त होते. देशभरात भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं आहे त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. देशभरात मोदीजींना समर्थन मिळतं आहे ही २०२४ ची नांदी आहे. महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका झाल्या. दोन्ही जागा आमच्याच येतील असं अपेक्षित होतं. मात्र कसबा पेठेत अतिशय चांगली मतं घेऊनही आम्ही विजयी झालो नाही. ४५ टक्के मतं आम्हाला मिळाली आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांना विजयाची सवय राहिलेली नाही आम्ही विजयाला सरावलो आहोत

कसब्यातला विजय हा काही महाविकास आघाडीचा विजय नाही. मी आज सभागृहातही बोललो की अलिकडच्या काळात एखादा विजयही मिळाला की आनंद गगनात मावेनासा होतो त्यामुळे विजय झाला की खूप त्यांना खूप आनंद होतो. २०२४ ला आम्ही कसबा पुन्हा जिंकू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्हाला विजयाची सवय आहे त्यांना विजयाची सवय राहिलेली नाही असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis taunt to former cm uddhav thackeray over his statement on bjp and kasba peth scj
First published on: 02-03-2023 at 22:37 IST