मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी येणाऱ्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनावरही ओमायक्रॉन या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचे सावट आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेतर्फे यावर्षीही शिवाजी पार्क मैदान परिसरात अनुयायांसाठी तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात येणार नाही. तसेच चैत्यभूमी परिसरात स्टॉल, दुकाने लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात.  गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन हा करोनाचा उत्परिवर्तित विषाणू आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.

नागरिकांमध्ये या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू नये म्हणून सामाजिक कार्यक्रम, तसेच जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारच्या गृह विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रमही रद्द

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने केंद्र सरकारने हा कार्यक्रम आखला होता व  त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेच्या विभाग कार्यालयाला दिले होते. मात्र हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली