scorecardresearch

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

“अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं, तरी…”

atul bhatkhalkar dhananjay munde
"पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय", भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला अर्थसंकल्पात विसर पडला, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता. पण, ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना प्रेमाचे उमाळे येत आहेत, असं प्रत्युत्तर अतुल भातखळकर यांनी दिलं आहे.

अतुल भातखळकर बोलताना म्हणाले, “धनंजय मुंडेंना अर्थसंकल्पीय भाषणात आम्ही ज्यांना आयुष्यभर नेते मानलं, अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची आठवण येत होती. अर्थसंकल्पात मुंडेंचा विसर पडल्याचं ते सांगत आहेत. पण, ज्यांनी जिवंतपणी आमदारकी मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, मनस्ताप दिला, त्यांना प्रेमाचे उमाळे येत आहेत. याला पुतणा-मावशीचं प्रेम म्हणतात.”

हेही वाचा : “…म्हणून भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला”, वैभव नाईक यांचा दावा

धनंजय मुंडेंनी भातखळकरांच्या भाषणावर हरकत घेतली. ते म्हणाले, “भातळखरांनी माझं नाव घेतलं, माझ्यावर आरोप केला, त्याला हरकत आहे. भातखळकरांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे. मी मुंडे साहेबांचा पुतण्या आहे. पंडीत आण्णांचा चिरंजीव आहे. मी पाठीत खंजीर खुपसला नाही. ११ जानेवारी २०१२ ला मला आणि माझ्या वडिलांना पक्षातून काढत, रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली.”

“मुंडे साहेबांच्या पाठीत कोणी-कोणी खंजीर खुपसला याचं सर्वजण साक्षीदार आहेत. दहा वर्ष त्याच संघर्षातून येथे आलो आहे. त्यामुळे व्यक्तीगत आरोप करू नये,” असा सल्ला धनंजय मुंडेंनी दिला.

हेही वाचा : वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

यावर अतुल भातखळकर यांनी म्हटलं, “कितीही नाटकी पणाने बोलला तर महाराष्ट्र फसणार नाही. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं. तरी गोपीनाथ मुंडेंना मनस्ताप देण्याचं काम तुम्ही केलं, ही वस्तुस्थिती आहे.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 11:18 IST
ताज्या बातम्या