विरोधी पक्षात असताना बारामती येथे जाऊन सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आता सरकार या आश्वासनाला हरताळ फासत असल्याचे सांगत विरोधी पक्षाने सोमवारी विधानसभेत सभात्याग केला तर कोणत्याही परिस्थितीत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस करणारा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.
सेना-भाजप विरोधी पक्षात असताना सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसात आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते मात्र सत्तेत येऊन चार महिने झाले तरी धनगर समाजाच्या आरक्षणबाबत सरकारकडून काहीही केले जात नसल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच जयंत पाटील यांनी धनगर समाजाला तात्काळ आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान मोदी यांनी आश्वासन देऊनही धनगर समाजाला विधिमंडळावर मोर्चा काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे मुख्यमंत्री आरक्षण देण्याची भूमिका घेतात तर त्यांच्याच पक्षाचे आदिवासी मंत्री आरक्षण देता येणार नाही, असे सांगतात याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. तर सरकार गंभीर नसल्याचे सांगत विरोधी पक्षाने सभात्याग केला. यावेळी उत्तर देताना मराठा आरक्षण न्यायालयात का टिकले नाही, असा सवाल करत कायदेशीर बाबी तपासून न्यायालयातही टिकेल आणि आदिवासींच्या आरक्षणालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेत केंद्राकडे धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस करणारा प्रस्ताव पाठवला जाईल असे खडसे यांनी सांगितले. केवळ धनगर समाजच नाही तर पारधी समाजासह आरक्षणाची गरज असलेल्या अन्य समाजांचाही विचार केला जाणार असल्याचे सांगितले.
विधान परिषदेत गदारोळ
सरकारने आरक्षणाबाबत धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरून विधान परिषदेत सोमवारी गदारोळ झाला. तब्बल चार वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतरही सभापतींनी विरोधकांची मागणी फेटाळल्यामुळे राष्ट्रवादीने सरकारचा निषेध करीत सभात्याग केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजास आरक्षण देऊन अनुसूचित जमातीचे फायदे देऊ अशी घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारने आता चालढकल सुरू केली आहे. सरकार या समाजासाठी पुढे आले असून त्यांच्याकडून नक्कीच न्याय मिळेल. आरक्षणाचा निर्णय लवकरच होईल असे सांगत महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करीत असल्याचा आरोप केला.
धनगर समाजाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
मुंबई: गेली अनेक वर्षांपासून आरक्षण ही धनगर समाजाची लढाई आहे. धनगरांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी समाजाची लढाई होईल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत असू. हा समाज कोणाकडं भीक मागत नसून आपला हक्क मागतोय. येणाऱ्या काळात अधिक संघर्ष करावा लागणार असून मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवा जाईन पण धनगर समाजाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे दिला.
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मदानावर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. बारामतीत धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यास १०० दिवसांत धनगरांना आरक्षण देऊ असा शब्द दिला होता. मात्र सत्तेत येऊन चार महिने उलटले तरी धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार चालढकल करून धनगर समाजाची फसवणूक करत आहे असा आरोप केला.
