मुंबई : धारावी पोलीस ठाण्यात एक हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एक आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान, मीरारोड येथे एक व्यक्ती दारूच्या नशेत धारावीत खून केल्याचे सांगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी खून केल्याचे सांगून धमकावतोय. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वेशांतर तरून आरोपीला वर्षभरानंतर अटक केली.

वर्षभरापूर्वी धारावीत एक हत्या झाली होती. त्यातील तीन ते चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पण त्यांचा साथीदार मोहम्मद उस्मान मोहम्मद असिफ (२६) पसार झाला होता. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. तरीही धारावी पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. दरम्यान, सहाय्यक निरीक्षक वैभव कदम यांना एका खबऱ्याचा फोन आला आणि एक व्यक्ती दारूच्या नशेत धारावीत खून केल्याचे बोलत असल्याचे त्याने सांगितले. एवढे करूनही पोलीस पकडू शकत नसल्याचे सांगून तो लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या एका हातात व्यंग आहे, असे खबऱ्याने सांगितले.

हे ऐकल्यानंतर ती व्यक्ती उस्मानच असणार हे जवळपास स्पष्ट झाले. वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर, निरीक्षक संगीता माने यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव कदम यांनी पथकासह लगेच मीरारोड येथील नयानगर गाठले. तेथे उस्मान समोर येताच त्यांच्या मुसक्या आवळून धारावीत आणण्यात आले. उस्मानचे दारू पिऊन मोठेपणा सांगणे धारावी पोलिसांच्या पथ्यावर पडले आणि पोलिसांनी आरोपीला पकडले.

वेशांतर करून पोलिसांनी पकडले

आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी वेशांतर करून परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी पोलिसांना तो सापडला. हातात व्यंग असल्यामुळे पोलिसांनी व खबऱ्याने त्याला ओळखले. त्यावरून तोच आरोपी असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्याला याबाबत विचारले असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला याप्रकरणी अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वीही अमली पदार्थ सेवन केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच एका व्यक्तीला धमकावल्याचीही जूनी तक्रार होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय होते प्रकरण

धारावी पोलिसांच्या हद्दीत रस्ता ओलांंडण्यावरून झालेल्या वादातून २५ वर्षीय तरूणाची हत्या झाली होती. आरोपी व त्याच्या साथीदारांनी या तरूणावर हल्ला केला होता. त्यात तरूणाला मृत्यू झाला होता. त्यामुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२), ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.