मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) मागील वर्षांपासून घरोघरी जाऊन झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करीत होती. पण आता विशेष पथकाद्वारे घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण करणे अखेर मंगळवारपासून बंद करण्यात आल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि एनएमडीपीएलने जाहीर केले आहे. आता बायोमेट्रिक सर्वेक्षण न झालेल्या रहिवाशांना डीआरपी किंवा एनएमडीपीएलच्या कार्यालयात जाऊन सर्वेक्षण करून घ्यावे लागणार असून तेथेच कागदपत्रे जमा करावी लागणार आहे.

बायोमेट्रिक सर्वेक्षणात सहभागी न झाल्यास रहिवाशांची पात्रता निश्चिती होणार नाही आणि पर्यायाने त्यांना घराच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बायोमेट्रिक न केलेल्यांनी तातडीने डीआरपी आणि एनएमडीपीएलच्या कार्यालयाशी संपर्क साधून सर्वेक्षणाची प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन डीआरपीकडून करण्यात आले आहे.

धारावीतील झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्यासाठी डीआरपी आणि एनएमडीपीएलने बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा आधार घेतला. त्यानुसार बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी अनेक पथक तयार करून गेल्या वर्षी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. या सर्वेक्षणाला अनेक ठिकाणी रहिवाशांनी तीव्र विरोध केला. असहकार पुकारला, अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा हुसकावून लावले. मात्र त्यानंतर वर्षभराहून अधिक काळ बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणानुसार पहिल्या टप्प्यात अंदाजे ५०० रहिवाशांचे परिशिष्ट-२ प्रसिद्ध करण्यात आले. मात्र घरोघरी जाऊन आणखी किती दिवस बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचे असा प्रश्न होता. त्यामुळे अखेर १२ ऑगस्टपासून घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण करणे बंद करण्यात आले आहे.

धारावी पुनर्विकास योजनेतील घरांचा, भाडेतत्वावरील घरांचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण करून घेणे गरजेचे आहे. आता बायोमेट्रिक न झालेल्या झोपडीधारकांना डीआरपी आणि एनएमडीपीएलच्या कार्यालयात जाऊन याबाबतची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

आतापर्यंत ८७ हजार झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण

एनएमडीपीएलकडून गेल्या वर्षीपासून घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. बांधकामांना क्रमांकित करणे आणि कागदपत्रे जमा करून घेत पात्रता निश्चिती करणे अशा दोन टप्प्यात हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत एनएमडीपीएलने घरोघरी जाऊन ८७ हजार ५०० हून अधिक रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तर १ लाखांहून अधिक बांधकामांना क्रमांकित केल्याची माहिती एनएमडीपीएलकडून देण्यात आली.