मुंबई : धारावी पुनर्विकासाअंतर्गत अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड येथील मिठागराच्या जागेवर करण्याचा मार्ग राज्य सरकारने नुकताच एका शासन निर्णयाद्वारे मोकळा केला आहे. मुलुंडमधील ४१.५० एकर मिठागराच्या जागेसाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची (डीआरपी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र धारावीकरांनी मुलुंडमध्ये न जाण्याचा ठाम निर्धार केला आहे. सरसकट धारावीकरांना धारावीतच घरे द्यावी, अशी मागणी ‘धारावी बचाव आंदोलन’ने केली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पहिल्यांदाच अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. या अपात्र धारावीकरांना धारावीबाहेर भाडेतत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पात सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी डीआरपीकडून मोठ्या प्रमाणावर मुंबईतील विविध ठिकाणच्या जागेची मागणी करण्यात आली आहे. मुलुंड, कुर्ला, कांजूरमार्ग, भांडूप, मालवणी अशा ठिकाणी अपात्र धारावीकरांसाठी भाडेतत्त्वावरील घरे बांधण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणची जागा मिठागराची आहे. मिठागराच्या जागेचा वापर केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा आक्षेप घेत या जागेला विरोध होत असताना, तसेच यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने अखेर मुलुंडमधील मिठागराच्या जागेवरील बांधकामाचा मार्ग मोकळा केला आहे. मुलुंडमधील ५८ एकरपैकी ४१.५० एकर जागेसाठी डीआरपीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून निुयक्ती करण्यासंबंधीचा शासननिर्णय नगर विकास विभागाने सोमवारी प्रसिद्ध केला. या शासननिर्णयामुळे आता ४१.५० एकरावर अपात्र धारावीकरांसाठी घरे बांधण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे मुलुंडकर, तर दुसरीकडे धारावीकर नाराज आहेत.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीतील सर्व नेत्यांनी मुलुंडमधील एक इंचही जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी दिली जाणार नाही, असे आश्वासन मुलुंडकरांना दिले होते. मात्र आता या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता लावून महायुती सरकारने मुलुंडच्या जागेसाठी डीआरपीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करून मुलुंडकरांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.

तर धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन व्हावे ही आमची मागणी असून या मागणीसाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. तर दुसरीकडे ‘धारावी बचाव आंदोलन’नेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत जे दोन प्रारुप परिशिष्ट-२ प्रसिद्ध झाले आहे, त्यात मोठ्या संख्येने धारावीकरांना अपात्र करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने धारावीकरांना अपात्र करून धारावीबाहेर फेकायचे आणि धारावीची जागा अदानीला आंदण द्यायची असा हा डाव आहे. पण हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सरसकट धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, एकही धारावीकर धारावीबाहेर जाणार नाही, असा निर्धार ‘धारावी बचाव आंदोलन’चे समन्वयक माजी आमदार बाबुराव माने यांनी व्यक्त केला. रविवारी (२ नोव्हेंबर) धारावीतील टिळक नगर येथे ‘धारावी बचाव आंदोलन’ची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत धारावीतच घरे मिळावीत यासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचेही माने यांनी सांगितले.