महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरकमहोत्सवी सोहळा वरळी येथील एनएससीआय डोम येथे नुकताच पार पडला. या प्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच, गझलनवाज भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२४, प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२४, अनुपम खेर यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२४ आणि अभिनेत्री काजोल देवगण यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४ प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विविध आठवणींना उजाळा देत आपण कृतज्ञ असून जबाबदारी वाढल्याची भावना या दिग्गज्जांनी व्यक्त केली.

मराठी गझलचे वैभव पुढे न्यायचे आहे

‘कारवा आहे गझलचा… जायचे आहे पुढे, मराठी गझलचे वैभव न्यायचे आहे पुढे…’ ५३ वर्षांच्या वाटचालीचा व ध्यासाचा हा एक छानसा विराम आहे. गुरुवर्य सुरेश भट यांच्या कार्याला मूर्तरूप देण्याच्या प्रयत्नांचा हा विराम आहे. हे सर्व रसिकांनी मिळवून दिले आहे, मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे. या प्रसंगी सुरेश भट यांची आठवण येते. त्यांनी मराठी भाषा साहित्याचे दालन समृद्ध केले. खूपच सुंदर गझल लिहिल्या आणि एक उत्तम काव्यप्रकार मराठी भाषेला दिला. या गझल माझ्या स्वरातून व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी खूप आनंदित आहे आणि रसिकांचे प्रेम व आशीर्वाद कायम राहील, अशी आशा बाळगतो. – गझलनवाज भीमराव पांचाळे

जगात सर्वात दिलदार शहर म्हणजे ‘मुंबई’

मी माझे नशीब अजमाविण्यासाठी ३ जून १९८१ रोजी मुंबईत आलो. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा – एनएसडी) सुवर्णपदक विजेता होतो. एका नोकरीची जाहिरात पाहून मुंबई गाठली होती, मात्र ही जाहिरात फसवणूक ठरली. तेव्हा माझ्या मित्राने मला त्याच्या घरी राहायला दिले. एका चाळीतील छोटाशा घरात आधीच ४ जण राहत होते, त्यामध्ये पाचवी व्यक्ती म्हणून माझी भर पडली होती. त्या घराच्या मालकीण सुलोचनाताई घरकाम करायच्या. एकदा सकाळी उठून घरमालकिणीच्या मुलाला माझा पत्ता विचारला, तेव्हा त्याने सांगितले की, ‘मुंबई, अनुपम खेर, २/१५, खेरवाडी, खेरनगर, खेररोड, वांद्रे (पूर्व)’ तेव्हा हा पत्ता वाचल्यानंतरच मला लक्षात आलं होतं, माझं स्वप्न पूर्ण करायला, मला जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. त्यानंतर काहीतरी करून दाखविण्यासाठी तीन वर्षे लागली. माझ्या कारकीर्दीचा आढावा घेणारी एक चित्रफीत पुरस्कार सोहळ्यात दाखविण्यात आली आणि चाळीस वर्षे कशी लोटली, कळलेच नाही. परंतु या शहराबद्दलचे माझे प्रेम व आदर अजिबात बदललेला नाही. कारण मुंबई शहर प्रचंड दिलदार आहे. मी जगातील विविध शहरांमध्ये जाऊन आलो आहे, पण मुंबई शहरासारखे विशाल हृदय जगातील कोणत्याही शहराचे नाही. या शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संधी मिळते आणि या संधीचे सोने करणे, आपल्या हातात असते. मी पहिल्या चित्रपटात ७० वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती आणि मी आज ७० वर्षांचा आहे. मी अद्याप आयुष्याच्या मध्यंतरापर्यंत पोहोचलेलो नाही, मी पुन्हा ३० वर्षांनंतर या मंचावर येऊन जीवनगौरव पुरस्कार स्वीकारेन.- अनुपम खेर, अभिनेते

ही खूप मोठी जबाबदारी…

मला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची बाहुली प्रचंड प्रिय आहे. ही बाहुली खूप वर्षांपूर्वी मला मिळाली होती आणि त्यानंतर मिळतच गेली. या पुरस्काराचा मला सार्थ अभिमान आहे, पण आज या बाहुलीचे महत्त्व फार मोठे आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टी योग्य हातात आहे आणि आपल्या मनोरंजनसृष्टीचा प्रवासही उंचावत चालला आहे, या गोष्टीचा विशेष आनंद व अभिमान आहे. मी वडाळ्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहायचो, आयुष्यात नेमके काय करायचे माहिती नव्हते. एक टेम्पो घेऊन वाहतुकीचा व्यवसाय करायचे ठरवले होते, तिथून इथपर्यंचा प्रवास चांगलाच झालेला आहे. वडापाव खाण्यासाठी बसचे पैसे वाचवून वडाळ्यावरून दादरमधील शिवाजी पार्कला चालत यायचो. तेव्हा प्लाझा चित्रपटगृहासमोरून जाताना शांताराम बापूंना प्लाझा चित्रपटगृहाकडे बघताना पाहिले आहे. आज त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला मिळतो आहे, हे माझे भाग्य असून खूप मोठी जबाबदारी आहे. निवृत्त होताना जीवनगौरव दिला जातो, असा अनेकांचा समज असतो, पण ही निवृत्ती नसून जबाबदारी आहे. अजून १० वर्षे तरी मी नवनवीन चित्रपट घेऊन तुमच्यापुढे येत राहीन. आजच्या नव्या दिग्दर्शकांना एक गोष्ट नक्की सांगेन, अलीकडे स्पर्धा खूप वाढते आहे आणि आपण सगळ्यांनी त्या स्पर्धेत उतरणे गरजेचे आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार.- महेश मांजरेकर, अभिनेते – दिग्दर्शक

यापूर्वी आईला मिळालेला पुरस्कार मला मिळणे भाग्य

माझ्या वाढदिवशी माझा सन्मान करण्यात आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सर्व दिग्गज मान्यवरांच्या हस्ते मला पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि या महत्त्वाच्या क्षणी माझी आई समोर बसून पाहते आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी आईची साडी नेसून कार्यक्रमाला आले आहे. यापूर्वी हा पुरस्कार माझ्या आईलादेखील मिळाला होता आणि आज तोच पुरस्कार मला माझ्या वाढदिवशी मिळतो आहे, यापेक्षा कोणताही मोठा पुरस्कार नाही. काजोल देवगण, अभिनेत्री

मी कृतज्ञ आहे, सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन

माझ्यावर विश्वास ठेवणारे सगळे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार आणि प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असून माझ्याकडे कौतुकाने पाहत आहेत. या क्षणी केवळ कृतज्ञता हा शब्द सुचतो आहे. महाराष्ट्र शासनाने माझे कायम मनापासून कौतुक केले आहे. तेव्हा मला पदार्पणातच ‘चकवा’ नावाच्या चित्रपटासाठी पारितोषिक मिळाले होते आणि आज ‘चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत आहे, या गोष्टीचा मनापासून आनंद असून कृतज्ञ आहे. ‘आतापर्यंत बरी वागली आहेस, यापुढे अजून अपेक्षा आहेत’ ही जाणीव आता या पुरस्काराने करून दिली आहे. या सर्व अपेक्षा मी मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.- मुक्ता बर्वे, अभिनेत्री

पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ची दमदार कामगिरी

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. तसेच सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे, सर्वोत्कृष्ट संवाद – अंबर हडप व गणेश पंडित, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – राहुल ठोंबरे व संजीर हाउलदार, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये, सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमेय वाघ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक २ – महेश लिमये या पुरस्कारांवर ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटाने विजयी मोहोर उमटवली. ‘जग्गू आणि ज्युलिएट’च्या संपूर्ण चमूचे मनःपूर्वक अभिनंदन, हे सर्वांचे एकत्रित यश आहे. ‘पुनीत बालन स्टुडिओज’ निर्मित सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, याबाबत मी प्रेक्षकांचाही आभारी असून भविष्यात अशाच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचे प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करेन’, असे निर्माते पुनीत बालन यांनी सांगितले.

प्रेरणादायी ‘आशा’

आपल्या कामातून निःस्वार्थपणे दुसऱ्याला जगण्याची आशा देणाऱ्या आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या लाखो आशा सेविकांची कथा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणाऱ्या दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’ या मराठी चित्रपटाने ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील ‘मालती’ या मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट, सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – दीपक पाटील, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उषा नाईक हे पुरस्कारही ‘आशा’ चित्रपटाने पटकावले. ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिळालेले चार विविध पुरस्कार उत्साह वाढवणारे आहेत. आता हा चित्रपट प्रत्येक गावातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची ‘आशा’ करूया’, असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले. तर या पुरस्काराच्या माध्यमातून सर्व आशा भगिनींच्या कार्याचा शासनाने उचित सन्मान केलेला आहे, असे निर्मात्या दैवता पाटील यांनी सांगितले.