कोकणी माणूस परिस्थितीबद्दल सतत रडत असतो, अशी टीका होत असली तरी रडण्यासारखी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांबाबत कधीच काही बोलले जात नाही. रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंत कोकणातील रेल्वेगाडय़ांबाबत कोकणी माणसांवर अन्यायच केला असून त्याचा आणखी एक दाखला यंदा गणपती विशेष गाडय़ांच्या निमित्ताने समोर आला आहे. कोकण मार्गावर पहिल्यांदाच धावणारी वातानुकूलित डबलडेकर गाडी ‘प्रीमियम’ म्हणून घोषित करून मध्य रेल्वेने या गाडीचे तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेले. मात्र त्याच वेळी मुंबई-अहमदाबाद या मार्गावर चालणारी हीच वातानुकूलित डबलडेकर सामान्य दरातच चालत आहे. नव्या वेळापत्रकातही या डबलडेकर गाडीच्या कोकणवारीबद्दल काहीच निश्चित नसल्याने कोकणवासीयांवर हा अन्याय असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईपासून अहमदाबाद आणि गोवा दोन्ही सारख्याच अंतरावर आहे. अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये मुख्यत: व्यापाऱ्यांचा भरणा असतो, तर कोकणात जाणारा प्रवासी चाकरमानी आहे. तरीही अहमदाबादला जाणारी वातानुकूलित डबलडेकर गाडी नेहमीच्या दरांत चालवली जाते. मात्र कोकणवासीयांना या गाडीच्या वारीसाठी दुप्पट-तिप्पट दर मोजावे लागतात. हा अन्याय आमच्याबाबतच का, असा प्रश्न प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी उपस्थित केला आहे.
मध्य रेल्वेमधील काही विशिष्ट अधिकारी वर्ग ही गाडी कोकणात चालवण्याबाबत अजिबातच उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळेच ही गाडी चालण्याआधीही मध्य रेल्वेकडून पारसिक बोगद्यातून गाडी जाण्यासंबंधी, गाडीच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या पिट् लाइनसंबंधी अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. तसेच प्रीमियम गाडी चालवून या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही, असे दाखवून ही गाडी कोकण मार्गावर न चालवण्याचा हा डाव असल्याचेही रेल्वेतीलच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डबलडेकर नियमित होण्याची शक्यता
सोमवारपासून नव्याने लागू झालेल्या वेळापत्रकात लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी अशी वातानुकूलित गाडी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र ही गाडी डबलडेकरच असेल का, ती प्रीमियम गाडी असेल का, याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. मात्र सध्या डबलडेकर गाडी या मार्गावर चालत असल्याने हीच गाडी नियमित होण्याची शक्यता आहे.
– के. एन. सिंह, मुख्य परिचालन अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different fare structure for konkan double decker trains
First published on: 02-09-2014 at 02:51 IST