मुंबई : अशी चिकमोत्याची माळ.. अष्टविनायका तुझा महिमा कसा.. ही अजरामर गाणी आजही गणेशोत्सवात ऐकू येत असली तरी बदलत्या काळानुसार या गीतांचे स्वर आता ‘डिजिटल’  झाले आहेत. खास गणेशोत्सवासाठीची अनेक गाणी आधी यूटय़ूबवर आणि नंतर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन किंवा डिजिटल संगीतवाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित केली जातात. परिणामी गणेशोत्सवातील गाण्यांची संख्या वाढली असली तरी कॅसेट, सीडी हे प्रकार कालबाह्य झाल्यामुळे गणेशोत्सवातील गाण्यांचे अर्थकारण बदलले आहे.

उत्सवाचा काळ सुरू झाला की दरवर्षी अनेक नवी गाणी येतात. प्रथम त्यांची प्रसिद्धी फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांवर केली जाते. त्यानंतर यूटय़ूब वाहिन्या आणि अन्य स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर ही गाणी ऐकली जातात व प्रसिद्ध होतात. तेथील दर्शकसंख्या बघून मंडपांमध्ये किंवा मिरवणुकीतील गाणी वाजविली जातात, अशी माहिती ‘सप्तसूर म्युझिक’ या यूटय़ूब वाहिनीचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली. गणेशोत्सवात नवी गाणी मोठय़ा संख्येने येतात. मात्र, त्यांना पूर्वीइतकी लोकप्रियता मिळत नाही. एक-दोन गाणी गाजतात, असे ‘कृणाल म्युझिक कंपनी’चे जयेश वीरा यांनी सांगितले.  गायक-संगीतकार डॉ. संजयराज गौरीनंदन यांच्या मते गाण्यांचे स्वरूप आणि माध्यम बदलले असले तरी गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजाराचा अंदाज गरजेचा

कोणतीही गाणी सध्या यूटय़ूब म्युझिकवर आधी प्रदर्शित होतात, तिथे ती पाहिली जातात. त्यानंतर हंगामा, विंक, सावन, गाना अशा नामांकित ‘अ‍ॅप्स’वर येतात. यूटय़ूबवर दर्शकसंख्या वाढली की, संबंधितांना चांगली रक्कम मिळते. त्यानंतर सातत्याने स्वामित्वहक्कानुसार मानधन मिळत राहते. ‘डिजिटल’च्या या बाजाराचा आवाका लक्षात घेऊन निर्मितीखर्च आणि प्रसिद्धी करणे आवश्यक असल्याचे तरुण संगीतकार प्रणील हातिस्कर याने सांगितले.