आत्मपरीक्षण पुरे, शस्त्रक्रियेचीच गरज; दिग्विजय सिंह, शशी थरूर यांनी तोफ डागली
पाच राज्यातील निकालांच्या पाश्र्वभूमीवर आत्मपरीक्षण करण्यात येईल, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केले असतानाच, ‘‘आत्मपरीक्षण पुरे झाले, आता शस्त्रक्रियेचीच आवश्यकता आहे’’, असे मत मांडून काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सोनियांच्या भूमिकेला छेद दिला आहे. शशी थरूर यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. दिग्विजय यांनी गुरुवारच्या आपल्या मताचे स्पष्टीकरण देताना शुक्रवारी राहुल गांधी यांचीच पाठराखण केली असली, तरी काँग्रेसमध्ये बदलांसाठीचा सूर आता वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.
पुद्दुचेरीची सत्ता मिळाली असली तरी केरळ आणि आसाम गमवावे लागल्याने काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षातील नाराजांच्या भावनेला दिग्विजय सिंह यांनी वाट करून दिली. पक्षात आता ठोस सुधारणा करण्याची वेळ आली आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले आहे. आत्मपरीक्षण बरेच झाले, आता दृश्य स्वरूपात बदल करण्याची वेळ आली आहे, असे मत खासदार शशी थरूर यांनीही मांडले आहे. पराभवानंतर पक्षात निर्माण झालेली अस्वस्थता बाहेर पडू लागली आहे.
आपल्या मताचे स्पष्टीकरण देताना दिग्विजय यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आणि पक्षाला पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने ए. के. अँटनी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली. सर्व ज्येष्ठ नेत्यांकडून तिने अहवाल मागविला होता. फेब्रुवारी २०१५मध्ये पक्षाकडे तो अहवाल सादरही झाला, पण १५ महिने उलटूनही त्यावर कारवाई झाली नाही. राहुल गांधी यांनीही सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. तसेच पक्षाच्या सरचिटणीसांना सर्व राज्यांतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून अहवाल देण्यास सांगितले होते. त्यांनीही फेब्रुवारी २०१५मध्येच अहवाल दिला असून त्यावरही कार्यवाही नाही, असे सिंह म्हणाले.
पक्षात दिग्विजय यांना एकेकाळी महत्त्व होते. पण अलीकडे त्यांना तेवढे गांभीर्याने घेतले जात नाही, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती.

तरुणांनी धुरा घ्यावी!
शस्त्रक्रियेच्या प्रतिक्रियेवर स्पष्टीकरण देताना सिंह यांनी राहुल यांची पाठराखण केली. राहुल यांनी पक्षनेतृत्व स्वीकारावे का, असे विचारता ते म्हणाले की, तरुणांनीच पक्षाची धुरा आता घेतली पाहिजे. नव्या कल्पना, नवी पद्धत, नवे प्रचारतंत्रच वापरले पाहिजे. नरेंद्र मोदी यांना वचवचा बोलत राहाण्याची वाचासिद्धी लाभली आहे तर राहुल शिकत आहेत, असा शेराही त्यांनी मारला.