मुंबई : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पवार यांनी गुरूवारी नोंदणी अर्ज करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर तंत्र शिक्षण विभागाकडून शुक्रवारी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार पदविका अभ्यासक्रमाची पहिली यादी १२ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
राज्यातील ४०० संस्थामधील सुमारे १ लाख ५ हजार जागांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. दहावीच्या निकालानंतर सुरू करण्यात आलेली प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत होती. २६ जून रोजी सायंकाळपर्यंत तब्बल १ लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३० हजार ८८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लक्षात घेत या अभ्यासक्रमाला अर्ज भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर संचालनालयामार्फत शुक्रवारी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे. या यादीवर ३ ते ५ जुलै दरम्यान हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलै रोजी जाहीर करून विद्यार्थ्यांना ८ ते १० जुलैदरम्यान पहिल्या फेरीसाठी अभ्यासक्रम आणि संस्था पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिली यादी १२ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत.
राज्यात सर्वत्र पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा उत्तम व एकसमान राखला जात असून, तंत्र शिक्षणामध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये विद्यावेतनासह प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच उत्तम पॅकेजची नोकरीही मिळत असल्याची माहिती तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.
असे आहे वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड : ३० जूनपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर : २ जुलै
यादीवर हरकती : ३ ते ५ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर : ७ जुलै २०२५
पहिली फेरीसाठी पसंतीक्रम भरणे : ८ ते १० जुलै
पहिली यादी जाहीर : १२ जुलै
प्रवेश घेण्याचा कालावधी : १३ ते १५ जुलै
पहिल्या फेरीनंतर रिक्त जागा जाहीर : १६ जुलै
दुसऱ्य फेरीसाठी पसंतीक्रम भरणे : १७ ते १९ जुलै
दुसरी यादी जाहीर : २१ जुलै
प्रवेश घेण्याचा कालावधी : २२ ते २४ जुलै
तिसरी फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : २५ जुलै
पसंतीक्रम भरणे : २६ ते २७ जुलै
तिसरी यादी जाहीर : २९ जुलै
प्रवेश घेण्याचा कालावधी : ३० ते ३१ जुलै
चौथ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : १ ऑगस्ट
पसंतीक्रम भरणे : २ ते ३ ऑगस्ट
चौथी व अंतिम यादी : ५ ऑगस्ट
प्रवेश कालावधी : ६ ते ८ ऑगस्ट
संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया
थेट अर्ज : ५ ऑगस्ट २०२५
संस्थास्तरीय प्रवेश : ९ ते १२ ऑगस्ट
प्रवेश प्रक्रियेची अंतिम टप्पा:
प्रवेशाची अंतिम तारीख : १४ ऑगस्ट
संस्थांनी डेटा अपलोड करण्याची अंतिम तारीख : १४ ऑगस्ट