मुंबई : विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात शासकीय विश्रामगृहामध्ये समिती प्रमुखांच्या सचिवाच्या कक्षात १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने आमदारांचे दौरे कशासाठी काढले जातात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा दौऱ्यांमध्ये आमदारांनी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी आल्यानंतर काही वर्षांपूर्वी हे दौरे बंद झाले होते. परंतु कालांतराने ते सुरू झाले. आतापर्यंत केवळ आरोप होत होते. परंतु आता प्रथमच रोख रक्कम सापडली आहे.
अंदाज समितीच्या धुळे-नंदूरबार दौऱ्यात समिती प्रमुख शिवसेना (शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांचे सचिव किशोर पाटील यांच्या नावे आरक्षित शासकीय विश्रामगृहातील कक्षात १ कोटी ८४ लाखांची रोख रक्कम सापडली. आमदारांच्या सरबराईसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून रोख रक्कम जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या प्रकरणी पाटील यांना निलंबित केल्याची घोषणा विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी केली. रोख रकमेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संताप व्यक्त केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नीतीमूल्यांच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शुक्रवारी चर्चा केली.
आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी होणारी पैशांची मागणी लक्षात घेऊनच तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी हे दौरेच बंद केले होते. दौरे बंद केल्याने ‘सरकारी पर्यटन’ होत नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर काही काळाने आमदारांचे दौरे सुरू झाले. कारवाई होणार,
की प्रकरण दडपणार?
दौऱ्यात पैशांचे घबाड सापडल्यावर कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित केले. परंतु समिती प्रमुख किंवा अन्य सदस्यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळला जाणार का, असा प्रश्न केला जात आहे. धुळे पोलीस तपास करीत असले तरी हे प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाण्याची शक्यता अधिक असल्याचेही बोलले जात आहेे.