काँग्रेसवाले पैशांनीच निवडणुका लढवीत असून त्यांच्या काळात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा सनसनाटी आरोप करत या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला असून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वक्तव्याचा कितीही अपप्रचार केला तरी, त्याचा येत्या निवडणुकांवर काहीच परिणाम होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यात स्पष्ट केले.
सिंचन घोटाळा प्रकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ध’ चा ‘म’ करून दाबले आणि त्यातील सत्य बाहेर येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी या वेळी केला. भाजपच्या ठाणे तसेच कोकण विभागाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या खर्चाविषयी जे वक्तव्य केले आहे, त्या संबंधीचा खुलासा निवडणूक आयोगाला त्यांनी केला आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी भाष्य केले असून त्यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर निवडणूक आयोग योग्य तो खुलासा करेल, असा विश्वास आम्हाला असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ३५ ते ५० टक्के आहे. मात्र, महाराष्ट्रात तेच प्रमाण अवघे आठ टक्के इतकेच असल्याने राज्यातील गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नेहमीच आश्वासन देणाऱ्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गृह खाते सोडून राष्ट्रीय प्रवचन करावे, असा टोमणा फडणवीस यांनी मारला.
आदर्श प्रकरण
केंद्र आणि राज्यात कोणतीही मोठी कामे होताना दिसत नसून त्यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला, अशी टीका करत आदर्श प्रकरणात राजकीय नेत्यांना वाचविणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना दोषी ठरविणे तसेच सीबीआयला रोखण्याकरिता चौकशीसाठी कमिशन नेमून त्यांना अर्धवट अधिकार द्यायचे, अशी सरकारची भूमिका राहिली आहे असा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
मुंडेंच्या वक्तव्याचा अपप्रचार – फडणवीस
काँग्रेसवाले पैशांनीच निवडणुका लढवीत असून त्यांच्या काळात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा सनसनाटी आरोप करत या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला असून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वक्तव्याचा कितीही अपप्रचार केला तरी, त्याचा येत्या निवडणुकांवर काहीच परिणाम होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यात स्पष्ट केले.

First published on: 03-07-2013 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disinformation of munde remark devendra phadnis