उन्हाळी विशेष गाडय़ा, वेगमर्यादा, तांत्रिक बिघाडाचा परिणाम
मुंबईत परतणाऱ्या उन्हाळी विशेष गाडय़ा, काही स्थानकांदरम्यान पावसाळी कामानिमित्त लावलेली वेगमर्यादा आणि तांत्रिक बिघाड यामुळे गेले काही दिवस मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाळी विशेष गाडय़ा आणि पावसाळापूर्व काम संपण्यास आणखी सात दिवस लागणार असल्याने प्रवाशांना आणखी सात दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.
मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील जलद बरोबरच धीम्या उपनगरीय रेल्वे गाडय़ा उशिराने धावत आहेत. गेल्या काही दिवसांत दुपारच्या सत्रातही हेच चित्र दिसू लागले आहे. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा ते चिंचपोकळी स्थानकांदरम्यान पावसाळ्यानिमित्त रुळांची व अन्य कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे जलद व धीम्या रेल्वे गाडय़ांचा वेग या स्थानकांदरम्यान कमी ठेवला जातो. परिणामी वेळापत्रक कोलमडले आहे.
मध्य रेल्वेने सोडलेल्या उन्हाळी विशेष गाडय़ांचाही मोठा फटका उपनगरीय रेल्वे गाडय़ांना बसत आहे. उत्तर भारत, दक्षिणेकडे सोडण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाडय़ा मुंबईत परतत आहेत. तेथून परततानाच त्यांना विलंब होत आहे. कल्याणपुढे त्यांना थांबवून ठेवले जाते. परंतु बराच वेळ थांबा देणे शक्य नसल्याने त्यांना मार्ग करून देण्यासाठी उपनगरीय गाडय़ांना थांबवून ठेवले जाते. जलद गाडय़ांच्या वेळापत्रकाला त्याचा फटका बसतो. विशेष गाडय़ांची सुविधा संपण्यास आणि पावसाळी काम पूर्ण होण्यासाठी किमान सात दिवस लागणार असल्याने प्रवाशांना आणखी काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
गेल्या दोन आठवडय़ात सिग्नल आणि ओव्हरहेड वायर बिघाड यासह तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी रात्री सातपासूनही मध्य रेल्वेवरील कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या.